बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील, अशी चर्चा सुरू असतानाच, पाटण्यात JDU कार्यालयाबाहेर काही पोस्टर्स लावण्यात आले आहेत. आज (गुरुवार) लावण्यात आलेल्या या पोस्टरवर, जे लिहिण्यात आले आहे, त्यावरून 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार हेच विरोधी पक्षांचे उमेदवार असतील, असे वाटते. यांपैकी एका पोस्टरवर, राज्यात दिसले, देशात दिसेल, असे लिहिले आहे. तर दुसऱ्या पोस्टरवर आश्वासन नाही, सुशासन, असे लिहिण्यात आले आहे.
काय आहे JDU चा स्टँड? -नितीश कुमार विरोधी पक्षांचे उमेदवार असतील की नाही? यावर,नितीश कुमारांमध्ये पंतप्रधान होण्याचे सर्व गूण आहेत. मात्र, ते उमेदवार नाहीत, असे जेडीयूचे म्हणणे आहे. मात्र, पाटण्यात जे पोस्टर लावण्यात आलेले आहेत ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीकडे इशारा करत आहेत. एका पोस्टरवर तर, नितीश आहेत तर सुशासन आहे, असे म्हणत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव नुकतेच पाटण्यात आले होते आणि त्यांनी नितीश कुमार यांच्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना, 2024 साठी तिसरी आघाडी नव्हे, तर मुख्य आघाडी असेल, असे दोन्ही नेत्यांनी सांगितले. मात्र, पंतप्रधानपदाच्या उमेदवारासंदर्भात केसीआर यांनी कुठल्याही प्रकारचे भाष्य करणे टाळले. पत्रकारांनी खोदून-खोदून विचारले असताही केसीआर यांनी कसल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.