आघाडीपूर्वीच विरोधकांच्या ऐक्यात फूट! केजरीवालांनी काँग्रेस समोर ठेवली मोठी अट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 05:33 PM2023-06-24T17:33:33+5:302023-06-24T17:34:34+5:30
या बैठकीत काँग्रेससह 15 पक्षांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, 450 जागांवरील उमेदवार, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि मणिपूरमधील हिंसाचार या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात देण्यासाठी बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली. यात काँग्रेससह (Congress) 15 पक्ष सहभागी झाले होते. मात्र, बैठकीनंतर जे काही दृष्य समोर आले, त्याने विरोधकांच्या ऐक्याचे सत्य समोर आणले आहे. या बैठकीत काँग्रेससह 15 पक्षांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, 450 जागांवरील उमेदवार, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि मणिपूरमधील हिंसाचार या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
या बैठकीनंतर, विरोधकांची संयुक्त पत्रकारपरिषदही पार पडली. मात्र यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहभागी झाले नव्हते. आम आदमी पक्षाने म्हटले आहे, केद्र सरकारने दिल्लीसंदर्भात आणलेल्या अध्यादेशावर जोवर साथ मिळणार नाही, तोवर पुढील बैठकीत सहभागी होणार नाही.
खरे तर, विरोधकांच्या ऐक्याला बळकटी येण्यापूर्वीच तडे जाताना दिसत आहेत. कारण या बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केजरीवाल सहभागी झाले नाही आणि आम आदमी पक्षाने एक स्टेटमेंट जारी करत, जोवर अध्यादेशासंदर्भात काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करत नाही, तोवर आम्ही पुढील रणनीतीत सहभागी होणार नाही, असे म्हटले आहे.
भाजपचा सवाल -
विरोधकांच्या या बैठकिवर भाजपनेही निशाणा साधला आहे. आगामी काळात विरोधकांचे हे ऐक्य तर दिसणार नाहीच, पण त्यांची आघाडीही दिसणार नाही, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. यातच, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी इंदिरा गांधी यांच्या सरकारमध्ये नीतीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांना जेलमध्ये टाकल्याचा उल्लेख करत, त्यांच्या राजकारणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महाआघाडीची धुरा कुणाकडे असणार? -
याच बरोबर, या महाआघाडीची धुरा कुणाकडे असणार? असा सवालही भाजपने केला आहे. भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले, वरातीचा नवरदेव कोण आहे? जर आपण 2024 मध्ये आला आहात तर आपला नवरदेव कोण? हे तर सांगा. एवढेच नाही, तर भाजपने या बैठकीला भ्रष्टाचाऱ्यांची बैठक म्हटले आहे.