नवी दिल्ली-
तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची (BRS) बुधवारी खम्मम शहरात जाहीर सभा होणार आहे, ज्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकपा) नेते के डी राजा देखील सामील होतील.
तेलंगणातील ही जाहीर सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे कारण तेलंगणा राष्ट्र समितीने 'बीआरएस' असं नाव बदलल्यानंतर होणारी ही पहिलीच जाहीर सभा आहे. त्यात बीआरएस, आम आदमी पार्टी (आप), समाजवादी पार्टी (एसपी) यांच्यासह विविध विरोधी पक्षांचीही हजेरी असणार आहे. डाव्या पक्षांचे नेते व्यासपीठावर एकत्र दिसतील.
यदाद्री येथील भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरालाही भेट देणारबीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि इतर नेते बुधवारी खम्ममला जाण्यापूर्वी हैदराबादजवळील यदाद्री येथील भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराला भेट देतील. राव सरकारने नुकतंच मंदिराचं नूतनीकरण केलं आहे. वरिष्ठ बीआरएस नेते आणि माजी खासदार बी विनोद कुमार म्हणाले की, सभेसाठी हजर राहणारे नेते हैदराबादपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये तेलंगणा सरकारच्या नेत्र तपासणी कार्यक्रमाच्या कांती वेलुगुच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.
एनडीए सरकारमध्ये धर्मनिरपेक्षता-समाजवादाची कमतरता भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि उदारमतवादासह संविधानाचा आत्मा कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात पर्यायी राजकारण आणण्यासाठी बीआरएस प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता खम्मम जाहीर सभेकडे विरोधी ऐक्याचे पाऊल म्हणून पाहिले जाऊ शकतं का, असं विचारलं असता कुमार म्हणाले की ही केवळ पुनरावृत्ती होणारी आघाडी नाही आणि बीआरएस हा देशाला नवा पर्याय ठरू शकतो असाही दावा करण्यात आला आहे.
भाजपाचा 'केसीआर'वर हल्लाबोलदरम्यान, भाजपच्या प्रदेश युनिटचे अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांनी मुख्यमंत्री केसीआर राव यांच्यावर निशाणा साधला. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना यादद्री मंदिरात नेल्याबद्दल टिका केली. "मंदिरे या कुटुंबासाठी उद्योग केंद्रे बनली आहेत. हिंदू मंदिर ही गुंतवणुकीची संधी आहे हे दाखवण्यासाठी केसीआर राव बीआरएस खम्ममच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नेत आहेत का?". असा सवाल उपस्थित करत भाजपा खासदारानं टीका केली.