Suvendu Adhikari : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. विधानसभेच्या ७० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील विजयामुळे भाजप नेत्यांनी जल्लोष केला. तर पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना इशारा दिला आहे. दिल्लीचा विजय आमचा आहे, २०२६ मध्ये बंगालचा नंबर येईल. दिल्लीप्रमाणे आता बंगालमध्येही बदलाची वेळ आली आहे. दिल्लीप्रमाणे बंगालमध्येही भाजपची लाट येईल आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन होईल, असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेस सरकारकडून गैरव्यवहार आणि पोलिसांचा गैरवापर थांबवता यावा, यासाठी सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या ममता सरकारवर आरोप करत म्हटले की, बंगालमधील पोलिसांचा वापर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी केला जात आहे.
दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुवेंदू अधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय हा भ्रष्टाचार आणि खोट्या राजकारणाच्या अंताची सुरुवात आहे. आपच्या सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विश्वासघात केला आणि भ्रष्टाचारात गुंतले, ज्याचे दिल्लीच्या जनतेने त्यांना उत्तर दिले आहे. तसेच, दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि ती आंतरराष्ट्रीय दर्जाची शहर बनवायला हवी होती, पण आपने ती उद्ध्वस्त केली, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले.
याचबरोबर, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशात ज्या पद्धतीने विकास झाला आहे, तोच विकास दिल्लीतही व्हायला हवा होता, असे सुवेंदू अधिकारी म्हणाले. तसेच, मोदी सरकारने यमुना एक्सप्रेसवे आणि इतर पायाभूत सुविधा विकसित केल्या, परंतु दिल्ली सरकार त्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले. याशिवाय, निवडणुकीत ९० टक्क्यांहून अधिक बंगाली मतदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याचा दावा सुद्धा सुवेंदू अधिकारी यांनी केला.