ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - दिवाळखोरीच्या उंबरठयावरुन फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणा-या स्पाईस जेट या भारतीय विमान कंपनीने बोईंगकडे विमान खरेदीची सर्वात मोठी ऑर्डर नोंदवली. स्पाईस जेट बोईंगकडून एकूण 205 विमाने विकत घेणार आहे. हा सर्व व्यवहार 1.5 लाख कोटी रुपयांचा आहे.
स्पाईस जेट बंद होण्याच्या मार्गावर असताना अजय सिंह यांनी कंपनीचे नेतृत्व स्वीकारले आणि कंपनीला नफ्यात आणले. आमच्या कंपनीची जी यशोगाथा आहे तशी आज जगात फार कमी उदहारणे आहेत. स्पाईस जेटने सलग सात तिमाहीत नफा कमावला. वेळेवर सेवा देण्याबरोबरच बुक झालेली तिकीटे रद्द होण्याचे प्रमाणही कमी आहे असे अजय सिंह यांनी सांगितले.
भारतात बोईंगच्या व्यवसाय वाढीसाठी स्पाईस जेटबरोबर करार महत्वाचा होता. बोईंगची स्पर्धक असलेल्या एअरबसला इंडिगो एअरलाईन्सकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. सध्या जगामध्ये भारत ही वेगाने वाढणारी हवाई बाजारपेठ असून इथे विमानांची निर्मिती करणा-या कंपन्यांच्या विकासालाही वाव आहे. स्वस्त हवाई तिकीटांमुळे वर्षाला भारतात हवाई प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या 20 टक्क्याने वाढत आहे.