भारतात पान आणि गुटखा खाण्याची सवय काही नवीन नाही. पान आणि गुटखा खाणं कर्करोगाला निमंत्रण देणारं ठरतं हे माहित असतानाही देशात याचं सेवन करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पान आणि गुटखा खाऊन कुठेही थुंकण्याच्या वाईट सवयीचा देखील भारत देश साक्षीदार आहे. कुठंही थुंकण्याची सवयी इतकी गंभीर झाली की कोलकातातील सुप्रसिद्ध हावडा ब्रीजच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला होता. भारतात पान, गुटखा खाऊन 'पिचकारी' मारणाऱ्यांचा एक आकडा अनोख्या पद्धतीनं 'इंडिया इन पिक्सल्स' या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी लोक पान खाऊन इतकं थुंकतात की त्यांच्या पिचकाऱ्यांमधून चक्क २११ ऑलिम्पिक साइज स्विमिंग पूल पूर्ण भरतील. 'इंडिया इन पिक्सल्स'नं नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या 'हाऊसहोल्ड कन्झमशन' आकड्यांची मदत घेतली आहे. हे सरकारी आकडे २०११-१२ या वर्षातील आहेत. एका रिपोर्टनुसार, पान खाऊन थुंकण्याच्या एका पिचकारीचं सरासरी वजन ३९.५५ ग्रॅम इतकं असतं आणि याची घनता १.१ ग्रॅम प्रति मिलीलीटर इतकी असते. तर ऑलिम्पिकच्या स्विमिंग पूलची क्षमता एकूण २५ लाख लीटर इतकी असते. या आकड्यांचा आधार घेत 'इंडिया इन पिक्सल्स'नं लक्षवेधी माहिती समोर आणली आणि लक्षात आलं की भारतीय लोक दरवर्षी पान खाऊन जितकं थुंकतात त्यानं तब्बल २११ स्विमिंग पूल भरतील. यातून देशात किती अस्वच्छता सार्वजनिक ठिकाणी पसरते याचा अंदाज लावता येईल.
देशातील फक्त ३ राज्यातच भरतील १०० हून अधिक स्विमिंग पूल'इंडिया इन पिक्सल्स'नं पिचकाऱ्या मारणाऱ्यांच्या बाबतीत प्रत्येक राज्याची आकडेवारी देखील दिली आहे. यानुसार देशात उत्तर प्रदेश राज्य पान खाऊन थुंकणाऱ्यांमध्ये सर्वात पुढे आहे. एकट्या उत्तर प्रदेशातील पिचकाऱ्या मारणाऱ्यांमुळे थुंकीमुळे वर्षभरात तब्बल ४६.३७ स्विमिंग पूल भरले जातील. यानंतर बिहार राज्याचा नंबर लागतो. या राज्यात वर्षभरात ३१.३३ स्विमिंग पूल भरतील इतकं लोक वर्षभरात पान खाऊन थुंकतात. ओडिशा राज्य तिसऱ्या क्रमांकावर असून येथील लोक वर्षभरात पान खाऊन थुंकले की २८.३७ स्विमिंग पूल भरतील इतकं थुंकतात. याचा अर्थ या तिन्ही राज्यांची आकडेवारी एकत्र केली तर तब्बल १०५ ऑलिम्पिक साइज स्विमिंग पूल भरतील.
कोलकाताचा हावडा ब्रिज कोसळणार होता!पश्चिम बंगालमध्येही थुंकणाऱ्यांची समस्या फार गंभीर आहे. पान, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांच्या यादीत पश्चिम बंगाल चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकातामध्ये या समस्येमुळे १० वर्षांपूर्वी हावडा ब्रिज कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. बीबीसीच्या तत्कालीन अहवालात याची माहिती देण्यात आली होती. पान आणि गुटखा खाऊन थुंकल्यामुळे हावडा ब्रिजचा स्टीलचा पाया निकृष्ट दर्जाजा होऊन अर्ध्यावर आला होता. ही गंभीर समस्या उजेडात आल्यानंतर एक खास स्किम तयार करावी लागली होती आणि पुलाचा पाया फायबरग्लासनं झाकण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं.