रायपूर : छत्तीसगडमध्ये २०१९ मध्ये सुरू झालेल्या कथित मद्य घोटाळ्यात २१६१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला आहे. घोटाळ्यात राज्यातील वरिष्ठ नोकरशहा, राजकारणी, त्यांचे सहकारी आणि उत्पादन शुल्क विभाग अधिकारी यांचा समावेश आहे, असेही ईडीने म्हटले आहे.
छत्तीसगडमधील कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी येथील विशेष न्यायालयासमोर दाखल केलेल्या तक्रारीमध्ये ईडीने म्हटले की, हे २१६१ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जायला हवे होते. ईडीने घोटाळ्यात काँग्रेस नेते आणि रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचा भाऊ अन्वर ढेबर, छत्तीसगड राज्य विपणन महामंडळ लि. चे व्यवस्थापकीय संचालक अरुणपती त्रिपाठी, मद्य व्यावसायिक त्रिलोक सिंग धिल्लन, हॉटेल व्यावसायिक नितेश पुरोहित आणि अरविंद सिंग यांना आरोपी केले आहे.
फिर्यादीची तक्रार आणि कागदोपत्री पुरावे अशी १३००० पाने न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. त्रिपाठी यांना सीएसएमसीएलद्वारे खरेदी केलेल्या मद्यावर गोळा केलेली लाच जास्तीत जास्त करण्यासाठी व सीएसएमसीएल चालवल्या जाणाऱ्या दुकानांमधून नॉन-ड्युटी मद्यविक्रीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे काम सोपवण्यात आले होते, असा आरोप त्यात करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)