नवी दिल्ली - चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटलीतून २१८ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. या नागरिकांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात आणण्यात आले आहे. हे सर्वजण दिल्लीत पोहोचले आहेत. यात 211 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे तब्बल 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21,000 हून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात आणण्यात आलेल्या या सर्वंना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) छावला येथील कॅम्पमध्ये त्यांना ठेवण्यात येईल. संकटकाळी भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे.
भारत सरकारने एकाच दिवसात 400 हून अधिक नागरिकांना एअरलिफ्ट करून भारतात आणण्यात आले आहे. यापूर्वी ईरानमधून आज सकाळी 234 जणांना भारतात आणण्यात आले आहे. त्यांना जैसलमेर येथील भारतीय लष्कराच्या वेलनेस सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.
शनिवारी दुपारी रवाणा झाले होते विमान
हे विमान शनिवारी दुपारी दिल्लीहून मिलानला रवाना झाले होते. यासंदर्भात, बोइंग 787 वर संचलित विमान रविवारी दुपारपर्यंत भारतात परतण्याची शक्यता आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एअरलाइनने दिल्ली-रोम आणि दिल्ली-मिलान मार्गावर 28 मार्चपर्यंत उड्डाने स्थगित केली आहेत.
या पूर्वी एअर इंडियाने शंघायहून 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत आणि हांगकाँगहून 7 फेब्रुवारी ते 28 मार्चपर्यंत विमान उड्डान रद्द केले आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत देशात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 96वरून 108वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 32 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, जगभरात 1,45,000 रुग्ण कोरोनाबाधित असून, जवळपास 5 हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.