2+2 India US DIALOGUE: भारत-अमेरिका यांच्यात शुक्रवारी 'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चा पार पडली. यात इस्रायल-हमास युद्धासह पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनसोबत सुरू असलेला वाद आणि कॅनडासोबत सुरू असलेला तणावसंदर्भातही चर्चा झाली. परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
इस्रायल आणि गाझा संदर्भात काय चर्चा झाली? युद्धबंदीबाबतही चर्चा झाली का? या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र सचिव म्हणाले, दोन्ही देशांमध्ये मध्यपूर्वेतील परिस्थितीवर चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी आपापली मते मांडली गेली. आमची भूमिका स्पष्ट आहे, जी चर्चेदरम्यानही आली होती की, दोन राज्यांचा तोडगा संवाद आणि शांततेवर आधारित असावा. इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. भारताचे दहशतवादाविरुद्धचे धोरण शून्य सहिष्णुतेचे आहे. दुसरीकडे, भारतानेही मानवतावादी मदत पाठवली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
चीन वादावरील चर्चेबाबत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की, चीनच्या आचारसंहितेबाबत प्रादेशिक दृष्टिकोनातून दोन्ही पक्षांमध्ये सविस्तर चर्चा झाली. भारत-कॅनडा वादावर काय चर्चा झाली? याबाबत ते म्हणाले, कॅनडाच्या मुद्द्यावर आमच्या सर्व भागीदार देशांशी वेगवेगळ्या वेळी चर्चा केली जाते. आमची चिंता सुरक्षेची आहे. तुम्ही पन्नूचे व्हिडिओ सतत पाहत असाल, जे भारतीयांच्या सुरक्षेशी संबंधित आहेत. आम्ही सुरक्षेशी संबंधित मुद्दे सातत्याने मांडत आहोत.
'टू प्लस टू' मंत्रिस्तरीय चर्चेत अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी केले. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.