कोलकाता- पश्चिम बंगाल राज्यात तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पूर्ण तयारीने निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी लोकसभेच्या येत्या निवडणुकीत बंगालमध्ये 22 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्रिपुरा विधानसभेत भरघोस यश मिळाल्यानंतर भाजपाने आपली सगळी ताकद पश्चिम बंगालमध्ये लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र येथे तृणमूल काँग्रेसने भाजपाला तितकेच आक्रमक प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी आतापासूनच एकमेकांवर आरोप करायला आव्हाने द्यायला सुरुवात केली आहे.पश्चिम बंगालमध्ये 22 पेक्षा अधिक जागां जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या अमित शाह यांना ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे. 22 जागाच काय 22 बूथ तरी जिंकून दाखवा असे मी आव्हान तुम्हाला देतो असे बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील एका सभेत वक्तव्य केले. या सभेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही संबोधित केले. नोटाबंदीमुळे नक्की काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रुपया अगदीच घसरला आहे. जंगलमहलमध्ये काही जागा काय जिंकल्या या लोकांनी हिंसेचे राजकारण सुरु केले आहे अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.
यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये सीपीआय पक्षासाठी धमक्या देण्याचे काम करायचे आता ते भाजपाच्या ताब्यात गेले आहेत. पंचायत निवडणुकांमध्ये मतदारांच्या रांगांमध्ये बीएसएफ घुसले होते असा आरोप ममता यांनी केला आहे. उत्तर प्रदेशात एन्काउंटरच्या नावाखाली लोकांना मारणे सुरु आहे. इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला विसरुन जा, आज लोकांना आपला धर्म निवडण्याचाही अधिकार उरलेला नाही. हे लोक इतिहास मिटवण्याचा प्रय्तन करत आहेत असा आरोप ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला. भाजपाने आज मुगलसरायचे नाव बदलले कदाचित लाल किल्ल्याचेही नाव बदलतील असे म्हणत एनआरसीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.