नवी दिल्ली - राज्यातील ओला दुष्काळ, पूरग्रस्तांना किंवा पावसाळ्यातील हानी भरुन काढण्यासाठी राज्य सरकारकडून फारशी मदत होत नाही. कारण केंद्र सरकार निधी देत नाही अशी ओरड महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत होते. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर केंद्र सरकारने आपला हात ढीला केला आहे. केंद्र सरकारकडून आज देशातील २२ राज्यांना आपत्ती निवारणासाठी ७५३२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. त्यामध्ये, सर्वाधिक निधी महाराष्ट्र सरकारला देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून हा निधी आजच वितरीत करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने आपत्ती निवारणासाठी २२ राज्यांना आज निधी वाटप केला असून महाराष्ट्राला सर्वाधिक १४२०.८० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या यादीत उत्तर प्रदेश राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून ओडिशाचा तिसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशला ८१२ कोटी रुपयांना निधी वितरीत करण्यात आला असून ओडिशाला ७०७.६० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होम स्टेट असलेल्या गुजरातला राज्य आपत्ती निवारणासाठी ५८४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार माजलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांना केंद्र सरकारने निधी देऊ केला आहे. त्यामध्ये, हिमाचल प्रदेशसाठी १८०.४० कोटी तर उत्तराखंडसाठी ४१३.२० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या यादीत सर्वात कमी निधी गोवा सरकारला देण्यात आला असून केवळ ४.८० कोटी रुपये गोवा राज्यातील आपत्ती निवारणासाठी देण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक निधी देऊ केला आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवयाउंचावल्या आहेत.