ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - येत्या पाच वर्षांमध्ये देशभरातील २२ हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे चौपदरीकरण करण्याचा चार लाख कोटी रुपयांचा प्रस्ताव रस्ते वाहतूक मंत्रालयाने बनवला असून तो मंत्रीमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दुपदरी मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी सध्याच्या धोरणानुसार दरदिवशी १५ हजार गाड्या त्या मार्गावर धावणे अनिवार्य आहे. ही मर्यादा १० हजारांवर आणण्याचा आणि जास्त लांबीचे महामार्ग चौपदरी करण्याचा सरकारचा विचार आहे.
यामुळे सध्याच्या रस्त्यांची स्थिती सुधारेल आणि देशभरातील विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे, असे एका उच्चपदस्थ अधिका-याने सांगितल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्गांच जाळं एक लाख किलोमीटर्सचे आहे. म्हणजे जवळपास एक पंचमांश जाळ्याचे चौपदरीकरण करण्याचा हा प्रस्ताव आहे.
गेल्या १५ वर्षांमध्ये ४८ हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचा स्तर वाढवण्यात आला असून या कामाला आणखी गती देण्याचा रस्ते वाहतूक खात्याचा प्रयत्न आहे. केवळ रस्त्याची लांबी वाढवू नका, तर दर्जाही सुधारा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचं जाळं ५० हजार किलोमीटरने वाढवणार आणि अस्तित्वात असलेल्या २२ हजार किलोमीटर दुपदरी मार्गाचं चौपदरीकरण करणार अशी ही योजना आहे. या महत्त्वांकाक्षी योजनांचं यश त्यासाठी लागणा-या प्रचंड निधीचा विचार करता खासगी गुंतवणुकीवर अवलंबून असेल असं एका अधिका-याने सांगितले.