हैदराबाद : ज्या तरुण वयात मुले कॉलेज जीवनाचा आनंद घेतात, त्या वयात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील एका भारतीय वंशाच्या तरुणाने चक्क कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे शुभम गोयल. कॅलिफोर्नियातील गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी तो रिंगणात आहे.शुभम हा मूळचा उत्तरप्रदेशचा. त्याच्या आई करुणा गोयल मेरठच्या आहेत. तर, वडील विपुल यांची लखनौमध्ये स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी आहे. शुभमने कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र आणि सिनेमाचा अभ्यासक्रम केला आहे. सध्या तो कॅलिफोर्नियामध्येच राहतो. कॅलिफोर्नियात रस्त्यावरील गर्दीपुढे शुभम गोयल मेगाफोनद्वारे भाषणे करतो आणि आपण या पदासाठी योग्य का आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो.डेमोक्रॅट गव्हर्नर जेरी ब्राउन यांच्याविरोधात आपण कसे जिंकू शकतो, हेही तो या नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समाजात मोठा बदल घडून येईल आणि शिक्षणासंबंधी समस्या समाप्त होतील, असा त्याला विश्वास आहे. (वृत्तसंस्था)स्वतंत्र आवाजाची गरजयेथे नागरिकांशी संवाद साधताना तो म्हणतो की, माझा जन्म कॅलिफोर्नियातील आहे. मी येथेच लहानाचा मोठा झालो आहे. मला वाटते की, आम्हाला एका स्वतंत्र आवाजाची आवश्यकता आहे. मी कुणाचाही समर्थक नाही किंवा एखाद्या पक्षाचा नाही. मी भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व आणि जागरुकता वाढवू इच्छितो. तरुणांना प्रोत्साहन देणे हा आपला उद्देश असून पैसा आणि प्रसिद्धीशिवाय बदल होण्यावर माझा विश्वास आहे. मला चांगले समर्थन मिळत आहे.
भारतीय वंशाचा २२ वर्षांचा तरुण कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरच्या स्पर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 1:27 AM