क्रिकेट खेळताना भयंकर घटना! अवघा २२ वर्षीय तरुण अचानक कोसळला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 01:43 PM2023-12-31T13:43:17+5:302023-12-31T13:46:06+5:30
छातीत वेदना होत असल्याने सदर तरुण मैदानाजवळ असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसला. मात्र काही वेळ विश्रांती केल्यानंतरही छातीतील वेदना कमी झाल्या नव्हत्या.
Cricketer Death News ( Marathi News ) : बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडच्या काळात आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसंच हृदयाशी संबंधित विकारही वाढले आहेत. तारुण्यातही हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले असून अशीच एक दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील खरगोन इथं घडली आहे. क्रिकेट मालिकेदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. इंदल पुत्र राम प्रसाद असं मृत तरुणाचं नाव असून त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरगोन इथं सध्या स्थानिक संघांमध्ये क्रिकेट मालिका सुरू आहे. या मालिकेत बरझर संघाकडून खेळणारा इंदल पुत्र राम प्रसाद हा अष्टपैलू खेळाडू होता. नुकत्याच झालेल्या सामन्यात बरझर संघाने प्रथम फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करत मोठी धावसंख्या उभारली. यामध्ये इंदलच्या फलंदाजीचाही सिंहाचा वाटा होता. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी बरझर हा संघ मैदानात उतरला. आपल्या फलंदाजीने संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास मदत करणाऱ्या इंदलने गोलंदाजीतूनही योगदान देण्याचं ठरवलं आणि तो गोलंदाजी करू लागला. मात्र काही वेळातच इंदलच्या छातीत दुखू लागलं.
छातीत वेदना होत असल्याने इंदल मैदानाजवळ असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसला. मात्र काही वेळ विश्रांती केल्यानंतरही छातीतील वेदना कमी झाल्या नव्हत्या. त्यामुळे इंदलने आपल्या मित्रांना आवाज दिला आणि मला दवाखान्यात घेऊन चला, अशी विनंती केली. त्यानंतर संघातील त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात दाखल होईपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांना तपासून इंदलला मृत घोषित केलं.
दरम्यान, अवघ्या २२ व्या वर्षी पोटच्या पोराला गमावल्याने इंदलच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्याच्या गावावर शोककळा पसरली आहे.