नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मिरमध्ये यंदाच्या वर्षभरात 223 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. हा गेल्या 8 वर्षातील सर्वाधिक आकडा आहे. याआधी 2010 मध्ये 232 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीपेक्षा यंदा दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. यंदा 429 घटना घडल्या. तर 77 नागरिक मारले गेले आहेत. तर दोन्ही वर्षी प्रत्येकी 80 जवान शहीद झाले आहेत.
आजपर्यंत काश्मीरच्या घाटीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा मिळत होता. मात्र, आता हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे. आता स्थानिक नागरिक जवानांना मदत करत आहेत. तर या दहशतवाद्यांना स्थानिक दहशतवादी आणि दगडफेक करणाऱ्या तरुणांकडूनही मदत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी काश्मीरमध्ये 213 दहशतवाद्यांना मारण्यात आले होते. यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता असून अद्याप तीन आठवडे शिल्लक आहेत. यंदा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये 93 विदेशी दहशतवादी होते. महत्वाचे म्हणजे काश्मीरमध्ये स्थानिक निवडणुकांच्या घोषणेनंतर 80 दिवसांत 81 दहशतवादी मारण्यात आले. तर 25 जून ते 14 सप्टेंबरदरम्यान 51 दहशतवादी मारण्यात आले.
काश्मीरमध्ये अद्याप 300 दहशतवादी सक्रीयकाश्मीरमध्ये अद्याप 250 ते 300 दहशतवादी सक्रीय आहेत. स्थानिक नागरिकांना चिथावणी देऊन दहशवादी संघटनांमध्ये भरती केले जात आहे. हिज्बुल मुजाहिदीन आणि अन्य दहशतवादी संघटना ही भरती करत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांच्या मृत्यूतही वाढ होत आहे.