नवी दिल्ली - देशातील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ( Amrit Mahotsav of Independence ) 75 हजार रोजगार देण्याच्या महाराष्ट्राच्या महासंकल्पातील पहिल्या टप्प्यात युवकांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली. पंतप्रधान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सरकारी नोकरीत लागलेल्या विविध अडीच हजार व्यक्तींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फेरेन्सींगद्वारे संवाद साधला. भविष्यात महाराष्ट्रात रोजगाराच्या अगणित संधी निर्माण होतील. सरकारकडून त्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, महाराष्ट्रात २२५ प्रकल्पांचे काम सुरू असल्याचंही ते म्हणाले.
''महाराष्ट्राच महासंकल्प'' या रोजगार मेळाव्यानिमित्त महाराष्ट्रील शेकडो युवकांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनपर कौतुक केले. तसेच, आगामी काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्यामध्ये, गृहविभागात पोलिसांची मोठी भरती होणार असून ग्रामीण विकास विभागातही रोजगार निर्मित्ती होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
सरकारकडून नवनवीन रोजगार निर्मित्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. बँक गॅरंटी घेऊन मुद्रा योजनेच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप केलं आहे. तसेच, लघुउद्योग, मध्यम उद्योग, एमएसएमई उद्योजकांना आर्थिक ताकद देत आहे. सर्वच प्रवर्गांना समान रुपाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, त्यामध्ये महिलांनाही समान संधी मिळत आहे.