लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. यावेळी एकूण 23 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. आज शपथविधी झालेल्या 23 मंत्र्यांमध्ये 18 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. तर पाच मंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्यासोबतच संबंधित मंत्र्यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरीही विचारात घेण्यात आली आहे. आज शपथ ग्रहण करणाऱ्या मंत्र्यांमधील काही चेहरे हे पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत. दरम्यान, योगींच्या मंत्रिमंडळात सात चेहरे असे आहेत ज्यांना त्यांच्या कामगिरीची दखल घेत मंत्रिडळात बढती देण्यात आली आहे. पैकी स्वतंत्र प्रभार असलेल्या पाच मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आहे. तर दोन राज्यमंत्र्यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. आज झालेल्या विस्तारानंतर उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या योगींना धरून 56 वर पोहोचली आहे.
योगींच्या मंत्रिमंडळात 18 नवे मंत्री, 5 जणांना बढती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 1:02 PM