शोपियन - दक्षिण काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात लष्करी सेवेत असलेल्या एका जवानाची गोळया झाडून हत्या करण्यात आली. इरफान अहमद दार असे मृत जवानाचे नाव आहे. शनिवारी सकाळी इरफानचा मृतदेह सापडला. शुक्रवार संध्याकाळपासून इरफान बेपत्ता होता. इरफान सुट्टी घेऊन घरी आलेला असताना त्याची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दहशतवादी संघटनांवर संशय व्यक्त केला आहे. इरफान फक्त 23 वर्षांचा होता. नियंत्रण रेषेजवळ गुरेझमध्ये लष्कराच्या इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये इरफान कार्यरत होता. इरफान अहमद दार काल संध्याकाळी घरातून त्याची गाडी घेऊन बाहेर पडला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला असे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. घटनास्थळापासून त्याची गाडी एक किलोमीटर अंतरावर सापडली.
दक्षिण काश्मीरच्या दौ-यावर असलेल्या जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या हत्येचा निषेध केला आहे. इरफान मूळचा काश्मिरी आहे. मे महिन्यात शोपियनमध्ये रहाणारे लेफ्टनंट उमर फय्याज (२२) यांची अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली होती. सप्टेंबर महिन्यात दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाचे जवान मोहम्मद रमझान यांची गोळया झाडून हत्या केली होती. मोहम्मद रमझान आणि त्यांच्या कुटुंबाने दहशतवाद्यांच्या अपहरणाच्या प्रयत्नाला प्रतिकार केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळया झाडून त्यांची हत्या केली होती.
कोण होते उमर फय्याज उमर फय्याज हे रजा घेऊन शोपियान जिल्ह्यात लग्न समारंभाला उपस्थित राहण्यास आले असताना, अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण करून हत्या केली. सहा महिन्यांपूर्वीच लष्करात रूजू होऊन ते काश्मीरमध्ये रोल मॉडेल बनले होते. पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील १२९ व्या तुकडीचे ते विद्यार्थी होते. दक्षिण काश्मीरमधील अशमुकुम येथील सरकारी नवोदय विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले होते.