श्रीनगर : जैश-ए-मोहम्मदचा फारसा परिचित नसलेला २३ वर्षे वयाचा व व्यवसायाने इलेक्ट्रिशयन असलेला दहशतवादी मुदसिर अहमद खान उर्फ मोहम्मद भाई याने पुलवामा हल्ल्याची योजना आखली होती. फरारी असलेल्या मुदसिरचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कसून शोध घेत आहे.१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, मुदसिर हा पदवीधर असून त्याने आत्मघाती हल्ला घडविण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहन व स्फोटके मिळवून दिली होती. त्राल येथील मिर मोहल्ला येथे राहणारा मुदसिरने दोन वर्षांपूर्वी जैश-ए-मोहम्मदसाठी भूमिगत राहून काम करत होता. त्यानंतर त्या संघटनेच्या नूर मोहम्मद तंत्री या दहशतवाद्याच्या गटात तो सक्रिय झाला. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया घडविण्यात नूरचा मोठा हात होता. डिसेंबर २०१७ मध्ये तंत्री चकमकीत मारला गेल्यानंतर मुदसिर अहमद खान १४ जानेवारी २०१८ रोजी घरातून पळून गेला. त्यावेळेपासून त्याने दहशतवादी कारवायाही वाढविल्या.आणखी दोन हल्ल्यांतही सामीलमुदसिर याने पदवी मिळविल्यावर आयटीआयमधून त्याने इलेक्ट्रिशियनचा एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातसंजावान येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागेही त्याचा हात होता.या हल्ल्यात सहा जवान शहीद व एक नागरिक ठार झाला होता. लेथपोरा येथे सीआरपीएफ तळावर जानेवारी २०१८मध्ये झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. या प्रकरणीही तपासयंत्रणांना तो हवा आहे.पुलवामातील हल्ल्याच्या चौकशीसाठी एनआयएच्या पथकाने २७ फेब्रुवारी रोजी मुदसिरच्या घरावर धाड टाकली होती. या हल्ल्याच्या कटातील सज्जाद भट या दहशतवाद्याचाही शोध सुरू आहे.
२३ वर्षीय मुदसिरने आखली पुलवामा हल्ल्याची योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:00 AM