नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी सैरभैर झालेले आहेत. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावा यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. यावर्षी पाकिस्तानने 10 ऑक्टोबर 2019 पर्यंत तब्बल 2317 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
भारतीय लष्कराची तटबंदी मजबूत असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जवान सक्षम आहेत. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील जवानांची तटबंदी मजबूत आहे. भारतीय जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत असतात. विविध कारवायांमध्ये आतापर्यंत 147 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येतं. जवळपास 500 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी सैरभैर झालेले आहेत. दहशतवाद्यांना आता पूर्वीसारखा पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत नाही, त्यामुळे ते सुरक्षा जवानांच्या हातातील शस्त्रे घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग चीफ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली आहे. ते म्हणाले, पाकिस्तान शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहे. तसेच अफगाण दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याच्या वृत्ताचंही त्यांनी खंडन केलं आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय जवान सक्षम असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने नवे कारस्थान आखल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी घडवण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. मात्र सिंधू खोऱ्यातील गुरेज विभागातून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले आहे. या भागातून जवळपास सहा वर्षांनंतर घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. लष्करामधील सूत्रांनी सांगितले की, घुसखोरीची ही घटना 27 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजी घडली. गेल्या काही वर्षांपासून सिंधू खोऱ्याचा भाग बऱ्यापैकी शांत आहे. येथे दहशतवादाविरोधातील शेवटची मोहीम 2013 मध्ये चालवण्यात आली होती. दरम्यान, ''नियंत्रण रेषेच्या प्रत्येक बाजूने दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यामुळे खोऱ्यातील लोक दहशतीच्या छायेत आहेत.