नवी दिल्ली- उद्या होत असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी आसिआन देशांच्या प्रमुखांना अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांचाही समावेश आहे. प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या इतिहासात म्यानमारच्या प्रमुखांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. आंग सान सू की यांचे भारताशी विशेष नाते आहे. आंग सान सू की यांचे शिक्षण दिल्लीमधील लेडी श्रीराम महाविद्यालयात शिक्षण झाले आहे.
आंग सान सू की यांची आई डॉ खिन की या म्यानमार सरकारकडून भारत आणि नेपाळसाठी राजदूत म्हणून नेमल्या गेल्या होत्या. राजधानी नवी दिल्लीमध्ये 24 अकबर रोड या बंगल्यामध्ये त्यांना राहायला मिळाले होते. पं. जवाहरलाल नेहरु या बंगल्याला बर्मा हाऊस असे म्हणत. सर एडविन ल्युटेन्स यांनी बांधलेला हा भारतीय आणि पाश्चिमात्य वास्तूशैलीचा संगम असणारा हा बंगला 15 वर्षांच्या सू की यांना विशेष आवडला होता. दिल्लीमध्येच त्यांनी कॉन्व्हेंट ऑफ जिझस अॅंड मेरी येथे शालेय शिक्षण पूर्ण केले तर लेडी श्रीराम महाविद्यालयात राज्यशास्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तत्कालीन पंतप्रधानांचे नातू राजीव आणि संजय गांधी यांच्याशी त्यांची मैत्री होती. त्यांच्याबरोबर राष्ट्रपती भवनाजवळ त्या घोडेस्वारीही शिकल्या. या सर्व आठवणींबद्दल त्यांनी द परफेक्ट होस्टेज या पुस्तकामध्ये लिहून ठेवले आहे.
आंग सान सू की यांनी आपण याच घरात पियानो वाजवायला शिकलो असेही या पुस्तकात नमूद केले आहे. आज या बंगल्यामध्ये काँग्रेस पक्षाचे मुख्यालय आहे. 1978 साली इंदिरा गांधी यांनी येथे पक्षाचे मुख्यालय सुरु केले. गेली चाळीस वर्षे याच बंगल्यातून भारतातील सर्वात जुना पक्ष चालवला गेला. आंग सान सू की यांना जी खोली देण्यात आली होती, त्याच खोलीमध्ये पक्षाच्या सरचिटणीस पदावरती असताना राहुल गांधी यांचे कार्यालय होते. अशा प्रकारे आंग सान सू की यांचे या घराशी अतूट संबंध आहेत. भारतामध्ये त्यांनी लोकशाहीसाठी केलेल्या कार्याचे नेहमीच कौतुक केले जाते. आंग सान सू की यांना जवाहरलाल नेहरु अॅवॉर्ड आणि भगवान महावीर पीस अॅवॉर्डने भारतात सन्मान करण्यात आला आहे.
आंग सान सू की यांचे वडिल आंग सान हे म्यानमारचे पितामह म्हणून ओळखले जातात तसेच त्यांना म्यानमारच्या स्वातंत्र्याचे शिल्पकारही म्हटले जाते. क्रांतीकारी वृत्तीचे आंग सान 1948 ते 47 असे ब्रिटिश क्राऊन कॉलनी ऑफ बर्माचे प्रमुख होते. स्वातंत्र्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले असले तरी त्यांना ब्रह्मदेश स्वतंत्र झालेला पाहता आला नाही. स्वातंत्र्यापुर्वी 6 महिने आधीच त्यांची हत्या करण्यात आली.
आंग सान सू की यांचा जन्म 19 जून 1945 रोजी रंगूनमध्ये झाला. 1960 मध्ये त्या आईबरोबर भारतात आल्या. त्यांची आई डॉव खिन क्यी यांची म्यानमारच्या नेपाळ व भारतामधील राजदूतपदावरती नेमणूक झाली होती. भारतामध्ये आंग सान यांनी नवी दिल्लीमधील कॉन्व्हेंट ऑफ जिझस अॅंड मेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि लेडी श्रीराम महाविद्यालयामध्ये राज्यस्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
त्यानंतर सेंट ह्युज महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये बी.ए पदवी मिळवली आणि राज्यशास्त्रात एम.ए पदवी संपादित केली. त्यानंतर त्यांनी एम. फिल पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणानंतर सू की यांनी संयुक्त राष्ट्रासाठी तीन वर्षे काम केले. त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉ. मायकेल एरिस यांच्याशी त्या 1 जानेवारी 1972 रोजी विवाहबद्ध झाल्या. डॉ. एरिस हे तिबेटीयन संस्कृतीचे अभ्यासक आणि भूटानच्या राजघराण्यातील मुलांचे शिक्षक होते. 1973 साली या दाम्पत्याला अलेक्झांडर आणि 1977 साली किम ही अपत्ये झाली.
1988 साली आईची काळजी घेण्यासाठी सू की म्यानमारमध्ये परतल्या मात्र लष्करशाहीने पोखरलेल्या मायदेशामध्ये लोकशाहीसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले व सरकारच्या विरोधातील प्रमुख आवाज म्हणून त्यांनी अल्पावधीत स्वतःचे स्थान निर्माण केले. मायकल यांच्याशी त्यांची 1995 साली शेवटची भेट झाली.एरिस यांना कर्करोग झाल्यामुळे त्यांना म्यानमारमध्ये जाण्याची किंवा सू ची यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी हवी होती. मात्र सू की यांना तेथिल सरकारने परवानगी दिली नाही.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोफी अन्नान तसेच पोप जॉन पॉल दुसरे यांनी विनंती करुनही म्यानमार सरकारने एरिस यांना व्हीसा दिला नाही. 1989 साली प्रथम सू की यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. म्यानमारमध्ये आल्यानंतर 21 वर्षांपैकी 15 वर्षे सू की यांनी नजरकैदेत घरातच काढली. एरिस यांचा 1999 साली ऑक्सफर्डमध्ये वयाच्या 53 व्या वर्षी मृत्यू झाला.
13 नोव्हेंबर 2010 रोजी सू की यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली. आज सू की म्यानमारच्या पहिल्या स्टेट कौन्सिलर बनल्या असून हे पद पंतप्रधानांसारखेच आहे. तसेच त्या देशाच्या परराष्ट्रमंत्रीही आहेत. आंग सान सू की यांना देशविदेशातील विविध सन्मान मिळाले नोबेल, राफ्टो, साखरोव, जवाहरलाल नेहरु अॅवॉर्ड, सायमन बोलिव्हॉं प्राईझ, ऑलोफ पामे प्राईझ, भगवान महावीर वर्ल्ड पीस, कॉंग्रेशनल गोल्ड मेडल अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.