नवी दिल्ली : भारत आपल्या नौदलासाठी अमेरिकेकडून २४ लॉकहिड मार्टिन-सिकोरस्की एमच-६० आर जातीची हेलिकॉप्टर या वर्षाच्या अखेरीपर्यंत खरेदी करणार आहे. हा संरक्षण व्यवहार १७,५०० कोटी रुपयांचा आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच मोठा संरक्षण व्यवहार असणार आहे.
या व्यवहाराशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लॉकहिड मार्टिन हेलिकॉप्टर ही बहुउपयोगी आहेत. ती अन्य देशांना विकण्याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने एक योजना तयार केली आहे. त्याअंतर्गत एका सरकारकडून दुसºया सरकारला त्या हेलिकॉप्टरची विक्री होणार आहे.
भारतीय नौदलातील ४२ व ४२ अ ताफ्यामध्ये सी किंग हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत होता; परंतु ती कालबाह्य झाल्याने त्यांच्या बदल्यात आता लॉकहिड मार्टिन हेलिकॉप्टर विकत घेण्यात येणार आहेत. यासंदर्भात भारत अमेरिकेशी आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात खरेदी करार करण्याची शक्यता आहे. २०२२ सालापर्यंत २४ लॉकहिड मार्टिन-सिकोरस्की हेलिकॉप्टर नौदलाच्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता आहे.
विनाशिकांचा लक्ष्यभेद शक्यलॉकहिड मार्टिन-सिकोरस्की हेलिकॉप्टरमधून एजीएम-११४ हेलफायर मिसाईल, एमके ५४ टार्पेडो, रॉकेट डागण्याची सुविधा उपलब्ध असेल. दोन इंजिन असलेल्या या हेलिकॉप्टरचा युद्धनौकेवर ताफा सज्ज असेल. त्यातून विमाने, विनाशिका यांचाही लक्ष्यभेद करता येणे शक्य आहे.
ही हेलिकॉप्टर भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट व्हावीत यासाठी गेल्या काही वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना आता फळ आले आहे. त्यामुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार आहे. त्याशिवाय नौदलासाठी अतिशय उपयोगी ठरणारी १११ हेलिकॉप्टर भारतातच बनविण्याच्या योजनेवरही विचार सुरू आहे. फ्रेंच बनावटीची चेतक हेलिकॉप्टर आता जुनाट झाली असून, त्यांची जागा ही हेलिकॉप्टर घेतील.