हैदराबाद - तेलंगणामध्ये तब्बल 24 मोरांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील दहा दिवसात तेलंगणामधील नागरकुर्नूल आणि गडवाल जिल्ह्यांमधील एकूण २४ मोरांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोरांची संख्या अधिक आहे.
काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी पिकांवर किडीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी किटकनाशकांची फवारणी केली होती. किटकनाशकयुक्त चारा खाल्लाने मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज हा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतांमध्ये वेगवेगळ्या जागी मृत अवस्थेत मोर पडलेले आढळून आले.
मोरांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. याबाबतची माहिती ही स्थानिक पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. मोरांच्या मृत्यूची माहिती मिळताच मोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तपासणी अहवालानंतरच मोरांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.