सुरेश एस. डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये यंदाच्या वर्षी साडेसहा महिन्यांत सुरक्षा दलांनी २४ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र, त्यावेळी झालेल्या चकमकींमध्ये सात जवान शहीद झाले होते. त्या केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद्यांनी यंदा १७ निरपराध नागरिकांची हत्या केली आहे. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी पहिल्या सात महिन्यांत १२ चकमकींमध्ये खात्मा केलेल्या २४ दहशतवाद्यांमध्ये १३ जण हे स्थानिक दहशतवादी, सीमेपलीकडून घुसखोरीकरण्याच्या प्रयत्नांत असताना, सुरक्षा दलाच्या गोळीबारात ठार झालेले ३ दहशतवादी यांचा समावेश आहे, तर अन्य आठ दहशतवाद्यांची ओळख पटू शकलेली नाही.
गेल्या वर्षी ५२ घुसखोरांसहित ७३ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. यंदा सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत काश्मीरमधील स्थानिक नागरिक असलेले दोन कुख्यात दहशतवादी ठार झाले आहेत.
स्थानिक दहशतवादी झाले चकमकीत ठार
यंदाच्या वर्षी श्रीनगर येथील स्थानिक दहशतवादी दानिश ऐजाज शेख हा पुलवामा येथील फ्रासीपोरा गावातील चकमकीत मारला गेला. शोपियां येथील बिलाल रसूल भट हा गोळीबारात ठार झाला. सैफुल्ला, नेहामा पुलवामा येथे रियाज अहमद डार, रईस अहमद या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला होता.