धाकड गर्ल! ऑइल टँकर चालवणाऱ्या २४ तरुणीची जोरदार चर्चा; एकावेळी करते ३०० किमीचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 03:22 PM2021-06-14T15:22:57+5:302021-06-14T15:24:43+5:30
केरळच्या कोच्ची येथील एमकॉमचं शिक्षण पूर्ण केलेली २४ वर्षीय तरुणी सध्या जोरदार चर्चेचा विषय बनली आहे. डेलीशा डेव्हिस असं या तरुणीचं नाव असून तिला लहानपणापासूनच ड्रायव्हिंगची आवड आहे.
केरळच्या कोच्ची येथील एमकॉमचं शिक्षण पूर्ण केलेली २४ वर्षीय तरुणी सध्या जोरदार चर्चेचा विषय बनली आहे. डेलीशा डेव्हिस असं या तरुणीचं नाव असून तिला लहानपणापासूनच ड्रायव्हिंगची आवड आहे. तिचे वडील डेव्हिस पीए हे गेल्या ४२ वर्षांपासून टँकर चालवतात. त्याचमुळे डेलीशाला देखील ड्रायव्हिंगची आवड निर्माण झाली. दुचाकी आणि कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर डेलीशा हळूहळू मोठमोठे टँकर चालवायलाही शिकली. आता ती आपल्या वडिलांचं काम पाहते आणि वडील चालवत असलेला तेलाचा भलामोठा टँकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्याचं काम ती करतेय. (24 year old Kerala girl drives tanker truck 300km a trip)
गेल्या तीन वर्षांपासून डेलिशा कोची ते मलप्पुरम असा प्रवास आठवड्यातून किमान तीनवेळा तरी करते. तेल रिफायनरी प्रकल्पापासून ते तिरूर येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल पोहोचविण्याचं काम ती गेल्या तीन वर्षांपासून करतेय. डेलिशा नेमकी आताच प्रकाशझोतात यायचं कारण म्हणजे दोन आठवड्यांपूर्वी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिचा टँकर रस्त्यात अडवला होता. एक लहान मुलगी लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय महामार्गावर भलामोठा टँकर चालवतेय अशी माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी तिला अडवलं होतं. पोलिसांनाही तिला पाहून धक्काच बसला होता. तिच्याकडे कागदपत्र आणि लायसन्सची मागणी केली. सर्व कागदपत्र योग्य असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं.
"वाहतूक पोलिसांनी माझ्याकडची सर्व कागदपत्र तपासल्यानंतर माझ्या कामाचं कौतुक केलं आणि माझं अभिनंदन केलं. त्यासोबतच तू करत असलेलं काम लोकांपर्यंत पोहोचायला हवं जेणेकरुन इतर तरुणींना प्रेरणा मिळेल असं म्हटलं. गेल्या तीन वर्षांपासून मी टँकर चालवतेय आणि कुणीतरी माझी दखल घेतली याचाच मला आनंद आहे", अशं डेलिशा सांगते.
डेलिशानं वयाच्या १६ व्या वर्षापासूनच टँकर चालवण्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. पण मुलीचं पक्क लायसन्य येईपर्यंत वाट पाहायला हवी असं तिच्या वडिलांचं ठाम मत होतं. वयाच्या २० व्या वर्षी तिला जड वाहतूक करण्याचं लायसन्य मिळालं. कारपेक्षा टँकर चालवणं खूप सोपं वाटतं असं डेलिशा म्हणते. एका फेरीत डेलिशा जवळपास ३०० किमीचा प्रवास करते.
कसा असतो डेलिशाचा प्रवास?
"माझा दिवस मध्यरात्री २ वाजल्यापासूनच सुरू होतो. सगळं उरकलं की पहाटे ४ वाजता टँकर घेऊन निघते आणि तिरुर येथे सकाळी साडेनऊच्या दरम्यान आम्ही पोहोचतो. त्यानंतर तिथं टँकर पेट्रोल पंपावर रिकामी केल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास मी घरी पोहोचते. मग संध्याकाळी मी ऑनलाइन पीजी क्लासेसला उपस्थिती लावते. ड्रायव्हिंग करणं ही माझी पॅशन आहे आणि माझे बाबा मला त्यासाठी खूप पाठिंबा देतात. एकदा मल्टी एक्सेल व्हॉल्वो बस चालवण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यासाठीचं लायसन्स मिळवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत", असं डेलिशानं सांगितलं.