खडगपूर : खडगपूर आयआयटीच्या वैज्ञानिकांना कोयना खो-यातील एका खेड्यात २.५ अब्ज वर्षांपूर्वीचे सजीवसृष्टीचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष सूक्ष्मजीवपेशींच्या रूपात असून, ते भूगर्भात तीन कि.मी. खोलीवरील खडकांत आढळले. भारतीय उपखंडात सजीवसृष्टीचे एवढे अतिप्राचीन पुरावे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.वैज्ञानिकांच्या चमूने कोयना खोºयातील करार नावाच्या गावात २०१४ ते २०१७ या काळात केलेल्या परिश्रमांनंतर हा शोध लागला आहे. त्यांचा शोधनिबंध ‘सायंटिफिक रिपोर्टस् : नेचर’ या आॅनलाईन वैज्ञानिक नियतकालिकाच्या डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. ‘नेचर’ या नियतकालिकाच्या प्रकाशकांतर्फे हे नियतकालिक प्रसिद्ध होते. सूक्ष्मजीव बव्हंशी बॅक्टेरियाच्या स्वरूपातील आहेत. त्यांचा २.५ अब्ज वर्षांपूर्वीचा कालखंड पृथ्वीवरील सजीवसृष्टीच्या उदयाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांतील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. वैज्ञानिक या कालखंडाला ‘ग्रेट आॅक्सिडेशन इव्हेंट’ म्हणून ओळखतात. या कालखंडात पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायू तयार व्हायला नुकती सुरुवात झाली होती, असे मानले जाते. कोयना परिसरात १९६४ मध्ये विनाशकारी भूकंप झाला होता. या भूकंपाची कारणे व मूळ याचा शोध घेण्यासाठी केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने खडगपूर आयआयटीमधील वैज्ञानिकांची तुकडी तेथे पाठवली होती. हा परिसर ‘डेक्कन ट्रॅप्स’ म्हणून ओळखला जातो. तेथे सर्वात प्राचीन ग्रेनाईट व बेसॉल्ट खडक आढळतात. करार गावात या वैज्ञानिकांनी तीन कि.मी. खोलीचे बोअर खोदल्यावर जो अत्यंत कठीण खडक लागला, त्यात या सूक्ष्मजीवपेशींचे अवशेष आढळून आले आहेत.>जगभरात होतेय संशोधन‘डेक्कन ट्रॅप’च्या पट्ट्यात ज्या प्रकारचे अतिप्राचीन कठीण खडक आहेत तसेच खडक दक्षिण आफ्रिकेत विटवॉटर्सरॅण्ड, अमेरिकेत कोलोरॅडो नदीचे खोरे व फिनलँडमध्ये फेन्नॉस्कॅन्डियन शील्ड येथे आढळतात. या ठिकाणी जगातील भूगर्भवैज्ञानिक प्राचीन व अतिप्राचीन जीवसृष्टीच्या शोधासाठी जिवाचे रान करीत आहेत. खडगपूर आयआयटीच्या वैज्ञानिकांनी केलेले हे संशोधन त्याच मार्गातील मैलाचा दगड ठरू शकेल.
कोयना खोऱ्यात २.५ अब्ज वर्षांपूर्वीचे सजीवसृष्टीचे अवशेष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 6:11 AM