तिरुवनंतपुरम : आचारी म्हणून काम करण्यासाठी मलेशियाला जाण्याची तयारी करत असलेल्या एका ऑटोरिक्षा चालकाने २५ कोटी रुपयांची ओणम बंपर लॉटरी जिंकली आहे. विशेष म्हणजे, एक दिवस अगोदरच त्यांचे तीन लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते.
श्रीवरहम येथील अनुप यांनी लॉटरीचे हे तिकीट खरेदी केले होते. अनुप म्हणाले की, आपण निवडलेले पहिले तिकीट न आवडल्याने आपण दुसरे तिकीट खरेदी केले आणि हेच तिकीट विजेते ठरले. बँकेने आजच कर्जाबाबत फोन केला होता. मी सांगितले की, मला आता त्याची गरज नाही. मी आता मलेशियालाही जाणार नाही. अनुप हे गेल्या २२ वर्षांपासून लॉटरीचे तिकीट खरेदी करत आहेत.
मी माझा फोन तपासला तेव्हा मी जिंकलो असल्याचे दिसले. यावर माझा विश्वासच बसला नाही आणि पत्नीला निकाल दाखवला. कर कपात होऊन अनुप यांना १५ कोटी रुपये मिळतील. आपले पहिले प्राधान्य कुटुंबासाठी घर बांधणे आणि कर्जाची परतफेड करणे हे आहे. नातेवाईकांना मदत, धर्मादाय कार्य आणि केरळातील हॉटेल क्षेत्रात काही सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.