नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गेले दोन आठवडे संसदेच्या कामकाजाचा खोळंबा झाला असताना सोमवारी काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणा लिहिलेले फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या पक्षाच्या २५ सदस्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याची घोषणा केली. सभागृहाच्या कामकाजात सातत्याने आणि हेतूपुरस्सर अडथळे आणणाऱ्या काँग्रेसच्या २५ सदस्यांना या आठवड्याच्या उर्वरित काळासाठी (५ दिवस) नियम ३७४ (अ) नुसार निलंबित करण्यात येत असून त्यांना सभागृहाच्या पाच बैठकींना उपस्थित राहता येणार नाही, असा आदेश महाजन यांनी दिला. हेतूपुरस्सर कामकाज रोखले जात असेल तर नियम ३७३ आणि ३७४ चा वापर केला जातो. नियमांवर बोट ठेवत अध्यक्षांनी कारवाई केली. राज्यसभेत गदारोळआयपीएलचे माजी घोटाळेबाज प्रमुख ललित मोदी यांना प्रवासासाठी दस्तऐवज देण्याबाबत मी ब्रिटनला कोणतीही विनंती केली नव्हती, असे विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत निवेदन देताना म्हटले. ललित मोदींना दस्तऐवज दिल्याबाबत विरोधकांनी केलेले आरोप निराधार असून त्यात काहीही तथ्य नाही, एवढीच वाक्ये त्या गदारोळात बोलू शकल्या. काँग्रेस सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचे निवेदन हाणून पाडले. स्वराज यांचे निवेदन बेकायदेशीर असल्याने ते संसदेच्या कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसने केली. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले.दरम्यान, जबाबदारी निश्चित करण्याबाबत पंतप्रधान उत्तर देणार नाहीत तोवर हीच परिस्थिती राहील, असे काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी म्हटले. त्यांनी नियम २६७ अन्वये कामकाजाचा तास निलंबित ठेवून चर्चा सुरू करण्याची मागणी केली होती, मात्र सभापतींनी चर्चा सुरू झाल्याखेरीज पंतप्रधान उत्तर देऊ शकणार नाहीत, असे सांगितले. त्यावर सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसची चर्चा सुरू करण्याची इच्छा नसेल तर स्वराज यांनी निवेदन देऊन चर्चा सुरू करावी, असे स्पष्ट केले. मी एक दिवस आधीच जेटली यांच्यामार्फत सर्व आरोपांना प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शविली होती, असे स्वराज म्हणाल्या.(लोकमत न्यूज नेटवर्क)
काँग्रेसचे २५ खासदार लोकसभेतून निलंबित
By admin | Published: August 03, 2015 11:44 PM