लखनऊ : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) 25 कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात ठिकठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायद्या(सीएए)विरोधात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते.
उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे नाव प्रामुख्याने समोर आले होते. 2006 मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया केरळमध्ये नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट या मुख्य संघटनेच्या रुपाने सुरु झाली होती. याआधी मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्रायाला पत्र पाठवून केली होती. बंदी घालण्याचे हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाने स्वीकारले सुद्धा होते.
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.