नवी दिल्ली - गुजरातमध्ये पोलीस स्टेशन परिसरात भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री लागलेल्या आगीत तब्बल 25 वाहने जळून खाक झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील खेडा शहरातील पोलीस स्टेशनच्या परिसरात रात्रीच्या सुमारास ही आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही. आग लागलेल्या वाहनांमध्ये दुचाकी, ऑटोरिक्षा आणि काही कारचा समावेश आहे. परिसरात प्रचंड धूर आणि आगीचे लोट पाहायला मिळाले.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही क्षणातच सर्वच्या सर्व वाहनांनी पेट घेतला आणि सर्व गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
नगरमध्ये रुग्णालयात अग्नितांडव, 11 मृत्युमुखी; मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश
अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाला शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत कोरोनावर उपचार घेणाऱ्या ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांत चार महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. सहा रुग्ण जखमींवर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे. गेल्या वर्षी कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग सुरू केला होता. तेथे १७ रुग्ण उपचार घेत होते. आगीचे लोट पाहून रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली.
कर्मचारी व नातेवाईकांनी रुग्णांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तोपर्यंत रुग्ण भाजून गंभीर जखमी झाले होते. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ आग विझवली. रुग्णांना कक्षातून जवळच असलेल्या प्रसूती कक्षात हलविले. काही रुग्ण व्हेंटिलेटर तर काही ऑक्सिजनवर होते. आगीत ते जळून खाक झाले. रुग्णांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ अधिकाऱयांची समिती चौकशी करेल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.