नवी दिल्ली : उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून, त्याचा सर्वात मोठा तडाखा उत्तर प्रदेशला बसला. तिथे कडाक्याच्या थंडीमुळे पक्षघात व हृदयविकाराच्या झटका येऊन २५ जणांचा मृत्यू झाला. १७ जण वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच मरण पावले. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी दाट धुके पसरले आहे. पंजाब, हरियाना, चंदिगड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पुढील २४ तास थंडी कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशातील कार्डिऑलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये हृदयविकारग्रस्त ७२३ रुग्णांनी गुरुवारी तपासणी करून घेतली. सात रुग्णांचे कडाक्याच्या थंडीमुळे रुग्णालयात निधन झाले. नॉयडा, गाझियाबाद, अयोध्या, कानपूर, लखनऊ, बरेली, मोरादाबाद आदी ठिकाणी तापमानात घट झाली आहे. हरयाणा, राजस्थान, पंजाबमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढला. तर काश्मीरमध्ये किमान तापमान किंचित वाढले आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागातही कडाक्याच्या थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत.
या कारणांमुळे होतो मृत्यूहृदयविकार तज्ज्ञांनी सांगितले की, थंडीच्या दिवसात हृदय तसेच मेंदू यांच्या क्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. कडाक्याच्या थंडीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. त्यामुळे रक्तदाब वाढून लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यात काही जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
दिल्लीत ३० विमानांच्या उड्डाणाला विलंबउत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी थंडीमुळे दाट धुक्याचे साम्राज्य आहे. त्याचा रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. गुरुवारी दिल्लीत तीन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती, तर शुक्रवारी या शहरातील आयानगर भागात १.८ अंश सेल्सिअस तापमान होते. दिल्लीमध्ये खराब हवामानामुळे ३० विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला. २६ रेल्वेगाड्या दिल्लीला उशिरा पोहोचल्या. कडाक्याची थंडी आणि धुकेय यामुळे अनेक शहरांमधील जनजीवन पुरते विस्कळित झाली आहे.