नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना सक्तीच्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी अॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) परीक्षेसाठी यंदापासून २५ वर्षे ही कमाल वयोमर्यादा लागू होईल. तसेच ही परीक्षा तीन प्रयत्नांत उत्तीर्ण होण्याचेही बंधन घालले आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने मंगळवारच्या बैठकीत हे निर्णय घेतले. त्यानुसार ‘नीट’साठी परीक्षार्थीचे किमान वय १७ वर्षे असणे गरजेचे असेल. तसेच ही परीक्षा वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंतच देता येईल. राखीव प्रवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असेल. आतापर्यंत कोणतीही मर्यादा नसल्याने ‘नीट’ परीक्षा कितीही प्रयत्नांत व वयाच्या कितीही वर्र्षापर्यंत देता येत होती. या निर्णयास केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतर अधिसूचना काढण्यात येईल व ‘नीट’ परीक्षेच्या माहिती पुस्तिकेत त्याचा समावेश केला जाईल.शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना या निर्णयाचे सर्वसाधारणपणे स्वागत केले. ज्यांचा खरेखरच वैद्यकीय शिक्षणाकडे कल आहे, असेच विद्यार्थी या परीक्षेला बसावेत व त्यांनी आधीपासून शिक्षणाचे क्षेत्र निवडून पूर्ण तयारीनिशी प्रवेश परीक्षा द्यावी, हा हेतू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय कोचिंग क्लासेसमधून होणाऱ्या गैरप्रकारांनाही यामुळे आळा बसू शकेल. सध्या ही परीक्षा देण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नसल्याने परीक्षेची पद्धत आणि प्रश्नपत्रिका यात वर्षागणिक होणारा बदल जाणून घेण्यासाठी कोचिंग क्लासवाले काही शिक्षकांनाच या परीक्षेला बसवायचे. ते प्रकार यामुळे बंद होतील. शिवाय गांभीर्याने परीक्षा न देणारे विद्यार्थी केवळ पेपर मिळवून तो फोडण्यासाठी पैसे देऊन परीक्षेला बसविले जाण्याचे प्रकारही यामुळे टळतील. दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय वैद्यकीयपूर्व प्रवेश परीक्षेत असेच गैरप्रकार होऊन ४५ विद्यार्थ्यांना मोठी रक्कम घेऊन फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची उत्तरे मोबाईलवर परीक्षेच्या जागी पाठविली गेली होती. यामुळे परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘नीट’ परीक्षेसाठी २५ वर्षे, तीन प्रयत्नांची मर्यादा
By admin | Published: January 26, 2017 1:37 AM