काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना दरमहा २,५०० रुपये; २०० युनिट वीज माेफत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 10:03 AM2023-11-18T10:03:47+5:302023-11-18T10:04:42+5:30
सिलिंडरसाठी ५०० रुपये, २०० युनिट वीज माेफत; पक्षाच्या जाहीरनाम्यात जनतेला ६ आश्वासने
हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये काँग्रेसने जनतेला सहा आश्वासने दिली आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा २,५०० रुपयांची मदत तसेच स्वयंपाकाच्या गॅससाठी दरमहा ५०० रुपये देण्यात येतील. प्रत्येक घराला २०० युनिट वीज मोफत दिली जाईल, असेही या ४२ पानांच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला ‘अभय हस्तम’ असे नाव दिले आहे. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, तेलंगणामध्ये वाहणारे वारे पाहता या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस विजयी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची कर्नाटकात अंमलबजावणी केली आहे, याकडेही खरगे यांनी लक्ष वेधले.
‘रयथू भरोसा’ या योजनेच्या अंतर्गत काँग्रेस तेलंगणातील शेतकऱ्यांना दरवर्षी १५ हजार रुपयांची, तर शेतमजुरांना १२ हजार रुपयांची मदत देणार आहे. चेयुथा या योजनेनुसार पात्र व्यक्तिंना ४ हजार रुपये इतकी पेन्शन देण्यात येईल. अशा प्रत्येक व्यक्तिला १० लाख रुपयांचा वैद्यकीय विमा मिळेल.
निदर्शकांच्या मृत्यूबाबत काँग्रेसने मागितली माफी
तेलंगणा राज्य निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनामध्ये काही निदर्शकांचा मृत्यू झाला होता. त्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी माफी मागितली आहे, तर काँग्रेसने माफी मागण्यास खूपच उशीर केला, अशी टीका भारत राष्ट्र समितीचे नेते व मंत्री के. टी. रामाराव यांनी केली.
तेलंगणामध्ये येणार आहे एक ‘वादळ’ : राहुल गांधी
तेलंगणा राज्य तिथे काँग्रेसला मिळत असलेल्या जोरदार पाठिंब्यामुळे एका ‘वादळाचे’ साक्षीदार बनणार आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खम्मम जिल्ह्यातील पिनापाका येथील जाीर सभेत सांगितले. ते म्हणाले की, विद्यमान सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा (बीआरएस) विधानसभा निवडणुकांत पराभव होणार आहे. तेलंगणात बीआरएसने प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. त्याचे जागोजागी दर्शन घडते आहे. तेलंगणामध्ये जनहिताचा विचार करणारे सरकार स्थापन करणे हे काँग्रेसचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्या राज्यात काँग्रेसरुपी वादळ आले आहे, याची मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना पूर्ण कल्पना आहे.
भाजपचा जाहीरनामा आज हाेणार प्रसिद्ध
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा जाहीरनामा आज, शनिवारी, १८ नोव्हेंबर रोजी जारी करणार आहेत. त्याच दिवशी त्यांच्या गडवाल, नलगोंडा आणि वरंगळ येथे जाहीर सभा होतील. सभांसाठी रवाना होण्याआधी शनिवारी सकाळी १० वाजता अमित शाह भाजपचा जाहीरनामा जारी करतील.
भाजपला धडा शिकवा : केसीआर यांचे आवाहन
भगवा पक्ष जातीयवादी तसेच कट्टरपंथी आहे. त्याशिवाय त्याच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही. जनतेने या पक्षाला मतदान करू नये व धडा शिकवावा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी मतदारांना केले. भाजपचे नाव न घेता केसीआर यांनी त्या पक्षावर शुक्रवारी एका प्रचारसभेत टीका केली. ते म्हणाले की, हिंदू धर्माच्या नावावर लोकांमध्ये मतभेद निर्माण केले जात आहेत.