बंगळुरू : कर्नाटक ‘सेक्स स्कँडल’वर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हासन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या ‘सेक्स स्कँडल’चे व्हिडीओ असलेले २५,००० पेन ड्राइव्ह राज्य सरकारने पोलिसांचा वापर करून निवडणुकीपूर्वी वाटले असल्याचा आरोप जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.
कुमारस्वामींनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला आहे, तसेच या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
एसआयटी पथक हे ‘सिद्धरामय्या तपास पथक’ आणि ‘शिवकुमार तपास पथक’ आहे, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे. रेवण्णा आणि प्रज्वल यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्वलवरही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेन ड्राइव्हचे वाटप पोलिस अधिकाऱ्यांनी केले होते. त्यांना ‘तसे करण्यासाठी धमकी देण्यात आली होती. व्हिडीओ असलेला पेन ड्राइव्ह बेंगळुरू ग्रामीण मतदारसंघात वाटण्यात आले आहेत. येथे डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आहेत. ही घटना २१ एप्रिल रोजी घडली होती आणि २२ एप्रिल रोजी आमच्या एजंटने या संदर्भात तक्रार केली होती. - एच.डी. कुमारस्वामी, नेते, जेडीएस
चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेले पथक निष्पक्ष तपास करत असून, राज्य सरकार त्यामध्ये थोडाही हस्तक्षेप करणार नाही. तपासाचे यश आता पूर्णपणे केंद्र सरकारच्या सहकार्यावर अवलंबून आहे. आरोपी प्रज्वल हा परदेशात असल्याचे सांगण्यात येत असून त्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे. अजूनही भाजपची जेडीएससोबत राजकीय युती आहे. भाजपने याबाबत भूमिका स्पष्ट करावी. - सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक
एसआयटी कोठडीत असलेले जेडीएस आ. एच. डी. रेवण्णा यांना विशेष न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत पुढे ढकलली आहे.
रेवण्णांवर कठाेर कारवाई व्हावी : मोदीnपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेडी (एस) खासदार रेवण्णांसारख्या व्यक्तींसाठी शून्य सहनशीलतेचे धोरण असायला हवे आणि प्रज्वल रेवण्णांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मोदींनी म्हटले आहे. nकाँग्रेस सरकारने प्रज्वलला देश सोडण्याची परवानगी दिल्याचा आणि वोक्कलिगातील निवडणुका संपल्यानंतर लैंगिक व्हिडीओ जारी केल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदींनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने या प्रकरणात कारवाई करणे ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे सांगितले.