ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - रिगिंग बेल या नोएडा स्थित कंपनीने अवघ्या २५१ रुपयात बाजारात आणलेला ‘फ्रीडम २५१’ स्मार्ट फोन वादाच्या भोव-यात सापडला आहे. या फोनच्या किंमतीवर मोबाईल उत्पादक कंपन्यांनी आक्षेप घेतला असून, सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे.
या फोनची किंमत ३५०० च्या खाली असू नये, इतक्या कमी किंमतीत फोनची विक्री कशी शक्य आहे असे प्रश्न मोबाईल उत्पादक कंपन्यांनी उपस्थित केले आहेत. अॅमिटी विद्यापीठाचा पदवीधारक असलेल्या मोहित कुमारने अवघ्या पाच महिन्यांपूर्वी ही कंपनी स्थापन केली आहे.
वर्तमानपत्रातून भारतातील हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मोबाईल कंपन्यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे मोबाईलच्या किंमतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फ्रीडम २५१ चा ४ इंचाचा क्यूएचडी डिसप्ले असून ९६० इनटू ५४० एवढे पिक्सल रिजोल्युशन आहे. याशिवाय क्वालकाम १.३ गीगाहर्टज् क्वाड-कोर प्रोसेसर आणि एक जीबीची रॅम असेल. अॅण्ड्रॉईड ५.१ लॉलीपॉप आॅपरेटिंग सिस्टीमवर आधारित या हॅण्डसेटमध्ये ८ जीबीची इंटरनल स्टोरेज सुविधा असून मायक्रो एसडी कार्ड वापरून ती ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकेल.
यात ३.२ मेगापिक्सलचा रियर आणि ०.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. त्याचबरोबर १,४५० एमएएचची बॅटरी त्याला इंधन पुरवेल. या फोनमध्ये वूमेन सेफ्टी, स्वच्छ भारत, फिशरमॅन, फार्मर, मेडिकल, व्हॉटस् अॅप, फेसबुक आणि यू ट्यूबसह अनेक अॅप्स इनबिल्ट असतील.
भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ विकत घेण्यासाठी नागरीकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. गुरुवारी सकाळी सहावाजल्यापासून कंपनीच्या संकेतस्थळावर बुकिंग सुरु झाले आहे. बुकिंग सुरु होताच कंपनीचे संकेतस्थळ क्रॅश झाले. आता वेबसाईट सुरु असली तरी, पेमेंट करण्यात अडथळे येत आहेत. फक्त २५१ रुपयातील हा ३ जी स्मार्टफोन अनेक आवश्यक फिचर्सनी युक्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे.