नवी दिल्ली: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये परवानगीशिवाय सुरू असलेल्या बालिकागृहातून २६ मुली गायब झाल्याची घटना समोर आली आहे. या मुली गुजरात, झारखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सीहोर, रायसेन, छिंदवाडा, बालाघाट येथील रहिवासी होत्या. परवानगीशिवाय बालिकागृह चालवल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
राष्ट्रीय बाल आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनीही मध्य प्रदेशचे मुख्य सचिव वीरा राणा यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. भोपाळच्या परवालिया पोलीस स्टेशन परिसरात हे अवैध बालिकागृह चालवले जात होते. भोपाळमधील एका खासगी एनजीओच्या वसतिगृहातून (चिल्ड्रन होम) मुली गायब झाल्यानंतर हा वाद सुरू झाला.
बालिकागृहातून २६ मुली बेपत्ता
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी भोपाळच्या बाहेरील परवालिया येथे चालवल्या जाणाऱ्या आंचल मुलींच्या वसतिगृहाला अचानक भेट दिली होती. यावेळी त्यांनी रजिस्टर तपासले असता त्यात ६८ मुलींच्या नोंदी होत्या. मात्र त्यातील २६ मुली गायब असल्याचे आढळून आले. बालगृहाचे संचालक अनिल मॅथ्यू यांना बेपत्ता मुलींबाबत विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. एफआयआरनुसार, मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या या बालगृहात अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत.
शिवराज सिंह यांनी चौकशीची केली मागणी-
सदर बाब समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर लिहिले की, भोपाळच्या परवालिया पोलीस स्टेशन परिसरात परवानगीशिवाय चालवण्यात आलेल्या बालगृहातून २६ मुली बेपत्ता झाल्याचे प्रकरण माझ्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन मी सरकारने गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी अशी विनंती करतो.