मुंबई : नाशिक येथील धुळे येथून राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगाराची बस विनाथांबा (एम.एच06 एस 8428 ) कळवणच्या दिशेने जात असताना देवळा पोलीस ठाणे हद्दीत मिशी फाट्यावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस समोरून येणाऱ्या काळ्यापिवळ्या अॅपे प्रवाशी रिक्षावर जाऊन आदळली. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. पीएमओ इंडिया या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.
महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. या दुःखद प्रसंगी मी मृतांच्या नातेवाईकांसोबत आहे. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच इच्छा. अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे.
तर नाशिकजवळ झालेल्या या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दहा लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य परिवहन महामंडळाकडून केला जाणार असल्याची माहिती परिवहन संसदीय कार्य तथा अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळ अॅड.अनिल परब यांनी दिली.