Indian NAVY : गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार आपल्या सैन्याची ताकद वाढवण्यावर अधिक भरत देत आहेत. आता लवकरच आपल्या भारतीय नौदलाची ताकदही आणखी वाढणार आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सोमवारी (2 डिसेंबर 2024) सांगितले की, भारत सरकार लवकरच 26 राफेल लढाऊ विमाने आणि तीन अतिरिक्त स्कॉर्पीन पाणबुड्यांच्या खरेदीसाठी पुढील महिन्यात स्वतंत्र करार करू शकते. याद्वारे चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास मदत मिळेल.
4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी असेही सांगितले की, सरकारने दोन एसएसएन (अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या) साठी मंजुरी दिली असून, अशा सहा पाणबुड्या तयार करण्याची योजना आहे. पहिली एसएसएन 2036-37 पर्यंत आणि दुसरी 2038-39 पर्यंत तयार होईल. नौदलासाठी राफेल मरीनवरील चर्चा बरीच पुढे सरकली असून, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीकडे जाण्यापासून ती फक्त एक पाऊल दूर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
नौदल प्रमुखांनी पुढे सांगितले की, गेल्या वर्षी जुलै महिन्यात संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सकडून राफेल मरीन जेट खरेदी करण्यास मान्यता दिली होती. याचा वापर प्रामुख्याने स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू वाहक INS विक्रांतवर केला जाईल. तसेच, देशाची नौदल क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, सध्या 62 जहाजे आणि एका पाणबुडीचे उत्पादन सुरू आहे.
पाकिस्तानची सागरी शक्ती वाढवण्यासाठी चीन मदत करत असल्याबाबत नौदल प्रमुख म्हणाले की, पाकिस्तानी नौदलाच्या अनेक युद्धनौका आणि पाणबुड्या चीनच्या सहकार्याने तयार केल्या जात आहेत. यावरून चीनला पाकिस्तानचे नौदल मजबूत करण्यात रस असल्याचे दिसून येते. त्यांच्या आठ नवीन पाणबुड्या पाकिस्तानी नौदलासाठी एक महत्त्वाची लढाऊ क्षमता असेल, पण आम्हाला त्यांच्या क्षमतेची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच शेजाऱ्यांकडून येणाऱ्या सर्व धोक्यांना सामोरे जाण्यासाठी आम्ही सुधारणा करत आहोत.