ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. २ - मुंबईवर २६/ ११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आपलं आयुष्यच बदलल्याची भावना विख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली. 'बडोदा मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे रतन टाटा यांना सयाजी रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, त्यानंतर ते तरूणांशी संवाद साधत होते.
'आयुष्यात मागे वळून बघितलं तर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे माझं आयुष्यचं बदलून गेल्याचं जाणवतं. त्या भीषण हल्ल्यानंतर मी तब्बल सहा महिने नीट बोलूही शकत नव्हतो, माझ्या आवाजात कंप जाणवयाचा, असं सांगणा-या रतन टाटांच्या शब्दांमधून त्या हल्ल्याची भीषणता जाणवत होती. रोज संध्याकाळी मी रुग्णालयांमध्ये जाऊन हल्यात जखमी झालेल्यांना, त्यांच्या कुटुंबियांना भेटायचो. काही जणांकडे उपचाराचे पैसे देण्यासाठीही कोणी उरलं नव्हतं, हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही सर्व ज्ञात व अज्ञात पीडितांच्या पुनर्वसनसाठी एका ट्रस्टची स्थापना केली असे सांगत त्या हल्लाने मला आणखी संवेदनशील बनवल्याचेही टाटांनी नमूद केलं.
यावेळी रतन टाटा यांनी भारत हे एक गुणवत्तेवर आधारित समान संधी देणार राष्ट्र म्हणून घडवण्याचे आवाहनही तरुणांना केले.
भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेले बडोदा राज्याचे प्रभावशाली संस्थानिक सयाजी राजे तृतीय यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. टाटा हे हा पुरस्कार मिळालेले दुसरे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्याआधी हा इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांना या पुरस्कारान गौरवण्यात आले होते.