मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात येत असतानाच २००८ मध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यावेळी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना आलेलं हौतात्म हे मुद्दे केंद्रस्थानी आले आहेत. काँग्रेस नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या गोळीने नाही तर संघाशी संबंधित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाल्याचा सनसनाटी दावा केला होता. त्यावरून आता आरोपप्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे. दरम्यान वाद वाढताच वडेट्टीवार यांनी हे आपलं विधान नाही आपण एसएम मुश्रीफ यांच्या पुस्तकातील संदर्भावरून असं बोलल्याची सारवासारव केली. मात्र त्यामुळे हा हल्ला हेमंत करकरे यांचा मृत्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.दरम्यान, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर हल्ला झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेल्या कामा रुग्णालयाच्या परिसरात दहशतवादी अजमल कसाब आणि एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे आमने सामने आल्यानंतर नेमकं काय घडलं होतं. याची सविस्तर माहिती २६/११ हल्ल्या प्रकरणी कोर्टात दाखल आरोपपत्रामध्ये आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्लात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे १६ जणांना वीरमरण आलं होतं. या प्रकरणी दाखल करण्यात आळेल्या आरोपपत्रानुसार पाकिस्तानमधून दहा दहशतवादी कराचीमधून समुद्रमार्गे मुंबईत आले होते. मुंबईत समुद्र किनाऱ्यावर उतरल्यानंतर ते विविध ठिकाणी पसरले. त्यापैकी मोहम्मद अजमल कसाब आणि अबू इस्माइल खान हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आले. तिथे त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात अनेक जण मृत्युमुखी पडले. तर शेकडो जखमी झाले.
त्यानंतर कसाब आणि इस्माइल हे कामा रुग्णालयात गेले. तिथे त्यांची पोलिसांच्या एका पथकासोबत चकमक झाली. या चकमकीत पोलीस अधिकारी सदानंद दाते आणि इतर काही पोलीस अधिकारी जखमी झाले. ही माहिती मुंबई एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, आयपीएस अधिकारी अशोक कामटे आणि इन्स्पेक्टर विजय साळसकर यांना मिळाल्यानंतर ते कामा रुग्णालयातील घटनास्थळाच्या दिशेने निघाले. कामा रुग्णालयात प्रवेश करण्याची त्यांची रणनीती होती.
या तिन्ही अधिकाऱ्यांनी आपली वाहनं सीएसएमटी स्टेशनजवळ सोडली आणि ते एसीपी शांतिलाल भामरे यांच्या क्वालिसमधून कामा रुग्णालयाकडे निघाले. त्यावेळी कॉन्स्टेबल अरुण जाधव आणि जयवंत पाटील हे या तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत होते. ते कामा रुग्णालयाच्या आवारात पोहोचताच त्यांचा आमना सामना दहशतवाद्यांशी झाला. ते समोरून येत होते. त्यावेळी झालेल्या भीषण गोळीबारात हेमंत करकरे आणि त्यांच्यासोबत असलेले विजय साळसकर आणि अशोक कामटे यांना वीरमरण आले. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रानुसार एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या छातीमध्ये दहशतवाद्यांनी झाडलेल्या तीन गोळ्या लागल्या होत्या. याबाबत राम प्रधान आयोगाने आपल्या तपास अहवालामध्ये लिहिले की, तिन्ही अधिकाऱ्यांचा समोरील गेटमधून कामा रुग्णालयात जाण्याचा निर्णय हा ऐनवेळी घेतलेला होता, तसेच दहशतवादी अचानक समोर येतील सा त्यांचा अंदाज नव्हता. या हल्ल्यात वाचलेले कॉन्स्टेबल अरुण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी कामा रुग्णालयातून बाहेर पडले आहेत याची माहिती या अधिकाऱ्यांना नव्हती. जेव्हा हे अधिकारी कामा रुग्णालयाच्या दिशेने जात होते. तेव्हा अचान समोरून दहशतवादी आले आणि चकमकीला सुरुवात झाली.
कॉन्स्टेबल जाधव यांनी आपल्या जबाबात सांगितले की, दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कामा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर क्वालिसमधून जाण्याचा निर्णय हा ऐनवेळी घेतलेला होता. दहशतवादी त्याच वाटेने येतील, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. कामा रुग्णालयाच्या समोर जाणाऱ्या रस्त्यावर आमची गाडी येऊन काही मीटर पुढे गेल्यावर दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला.
आरोपपत्रामधील उल्लेखानुसार दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी क्वालिसवर कब्जा केला. तसेच मेट्रो जंक्शनच्या दिशेने निघाले. तिथे त्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस कॉन्स्टेबल अरुण चित्ते यांना वीरमरण आले. नंतर ही क्वालिस गाडी सोडून देत कसाब आणि त्याच्या सहकाऱ्याने एक स्कोडा कार बळकावली. तिथून ते गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघाले. मात्र वाटेत पोलिसांनी बॅरिकेडिंग करून बंदोबस्त केला होता. तिथे तुकाराम ओंबळे आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी स्कोडा कार अडवली. त्यावेळी झालेल्या गोळीबारात कसाबला पकडताना तुकाराम ओंबळे यांना वीरमरण आले. मात्र कसाब जिवंत सापडला. तसेच नंतर त्याच्या चौकशीमधून या दहशतवादी हल्ल्याबाबतची धक्कादाय माहिती समोर आली.