ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २६ - मुंबईवर २६/११ रोजी झालेला हल्ला आमच्यासाठी कधीही न विसरता येण्याजोगी वेदना असल्याचे सांगत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्क परिषदेदरम्यान व्यक्त केली. आपण पास-पास व साथ-साथ राहण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्ष पूर्ण होत असून नेपाळमधील सार्क परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी दहशतवादाचे उच्चाटन करण्याची व्यक्त केली.
परस्परांतील मतभेदांमुळे सार्क समुहातील देशांच्या विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पायाभूत सुविधांवर काम करण्याची गरज व्यक्त केली. बँकाक किंवा सिंगापूरला जाणं सोपं आहे, पण सार्क देशांतर्गत प्रवास करणं कठीण आहे असं सांगत रेल्वे, रस्ते या पायाभूत सुविधांसह वीजेच्या देवाण-घेवाणीबाबत सार्क देशांनी संयुक्तरित्या काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्या भाषणादरम्यान मोदींनी व्यापार व विकास या महत्वाच्या मुद्यांचा उल्लेख करत विकासासाठी व्यापार हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले. सार्क देशांतील व्यापाराला चालना मिळण्याची गरज असून व्यापारवृद्धीसाठी भारत सार्क देशांना तीन ते पाच वर्षांसाठी बिझनेस व्हिझा देईल तसेच या देशातील तरूणांना रोजगाराची संधी देईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.