नवी दिल्ली - 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदवरील बंदी उठविण्याचा अर्ज संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळून लावला आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफिज सईदचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघाने ब्लॅकलिस्ट दहशतवाद्यांमध्ये केला होता. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मद प्रमुख मसूद अजहरवरही बंदी आणण्याचा प्रस्ताव आहे.
पाकिस्तानमध्ये असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. पीटीआयच्या सुत्रांनुसार दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा अर्ज संयुक्त राष्ट्र संघाने फेटाळला आहे. भारताविरोधात वारंवार गरळ ओकण्याचे काम हाफिज सईद पाकिस्तानात बसून करतो. अनेकदा भारताने सईदविरोधात सबळ पुरावे पाकिस्तानला देऊनही त्याच्यावर कारवाई केली जात नाही. सईदच्या हालचालींचे अनेक पुरावे भारताने संयुक्त राष्ट्र संघाकडे सादर केले आहेत.
मुंबईत 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. पाकिस्तानात बसून मास्टर माईड हाफिज सईद मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार म्हणून त्याचे नाव आरोपपत्रात आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून 10 डिसेंबर 2008 रोजी हाफीज सईदवर बंदी आणली होती. 2017 रोजी हाफिज सईदने लाहोरमधून आपल्या वकिलांमार्फत संयुक्त राष्ट्रसंघात अपील केले होते. आपल्यावरील बंदी उठविण्यात यावी अशी मागणी हाफीज सईदने अर्जात केली होती.