नवी दिल्ली - 26/11 मुंबई हल्ल्याची सुनावणी करत असलेल्या पाकिस्तान कोर्टाला भारत दणका देण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पाकिस्तानी कोर्टाकडून वारंवार होणारी दिरंगाई तसंच मुंबई हल्ल्यातील 24 भारतीय साक्षीदारांना पाकिस्तानी अधिका-यांसमोर सादर करण्याच्या हट्टापायी या प्रकरणाची सुनावणी कोणत्याही ठोस परिणामांशिवाय समाप्त होताना दिसत नाही. पाकिस्तानी कोर्ट मुंबई हल्ल्यातील 24 भारतीय साक्षीदारांची पाकिस्तानी अधिका-यांद्वारे विचारपूस चौकशी करू इच्छित आहे, याशिवाय पाकिस्तानी कोर्ट पुढे जाण्यास तयार नाही. आता साक्षीदारांच्या मुद्यावरुन पाकिस्तानची आडमुठी भूमिका समोर येत आहे. तर दुसरीकडे, भारत साक्षीदारांना पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी क्वचितच तयार आहे. यावर भारताचं असे म्हणणे आहे की, पाकिस्तान 26/11 हल्ल्याची सुनवाणीसंदर्भात गंभीर नाही आणि पाकिस्तानची याबाबत कोणत्याही तर्कशुद्ध परिणामांपर्यंत पोहोचवण्याची इच्छादेखील नाही.
गेल्या आठवड्यात युरोपीयन युनियनसोबत पार पडलेल्या संयुक्त निवेदनादरम्यान भारतानं 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा देण्याची बाब पुन्हा मांडली होती. एका भारतीय अधिका-यानं सांगितले होते की, मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद पाकिस्तान सरकारच्या सुरक्षेत बिनधास्तपणे मोकाट फिरत आहे. भारतानं हाफिजविरोधातील पाकिस्तानकडे ठोस पुरावे सादर केले होते तरी अद्यापपर्यंत तो मोकाटच आहे. दरम्यान, मुंबई हल्ल्याच्या सुनावणीसाठी सर्व 24 साक्षीदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याच्या मुद्यावर भारतानं विचारविनिमय केला आहे, मात्र पाकिस्तानकडून अद्यापपर्यंत यासंदर्भात कोणताही औपचारिकरित्या प्रस्ताव आलेला नाही. पाकिस्तानी कोर्ट याप्रकरणी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख जकीउर रहमान लख्वीसहीत 7 जणांविरोधात सुनावणी करत आहे. लख्वीव्यतिरिक्त वाजिद, मजहर इकबाल, हामिद अमीन सादिक, शहीद जमीन रियाज, जमील अहमद आणि युनूस अंजुमवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि 2008मध्ये मुंबईत हल्ला घडवण्यासाठी कट रचल्याचा आरोप आहे.
मुंबई हल्ल्यासंदर्भात सर्व ठोस पुरावे पाकिस्तानला सोपवण्यात आले आहेत, असे यापूर्वीच भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पुराव्यांद्वारे 26/11 च्या आरोपींना शिक्षा मिळू शकते,असंही सांगण्यात आले आहे. गेल्या 8 वर्षांपासून मुंबई हल्ला प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. मात्र, कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे पाकिस्तानकडून याप्रकरणात दिरंगाई केली जात आहे. गेल्या 8 वर्षांत 9 न्यायाधीशांची बदलीदेखील करण्यात आली.
दरम्यान, पाकिस्तानी कोर्टाच्या एका अधिका-यानं सांगितले की, भारतीय साक्षीदारांना येथे आणण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे. जर साक्षीदारांना सादर करण्यात आले नाही तर भारतीय साक्षीदारांचा जबाब नोंदवल्याशिवाय कोर्ट या प्रकरणाची सुनावणी करण्याची शक्यता आहे, अशा उलट्या बोंबा पाकिस्ताननं मारल्या आहेत.