मुंबई - २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला अखेर भारतात आणलं आहे. अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणल्यानंतर NIA कडून त्याची चौकशी सुरू आहे. मुंबई हल्ल्यात आयएसआय, लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनांची काय भूमिका होती याचा शोध घेतला जात आहे. राणाने चौकशीत महत्त्वाचे खुलासे केले आहेत. जेव्हा २६ नोव्हेंबरच्या हल्ल्याची तयारी सुरू होती त्यावेळी असणारे नेटवर्क शोधले जात आहे. त्यातच NIA आता एका मिस्ट्री गर्लचा शोध घेत आहे.
तहव्वूर राणा जेव्हा भारतात आला होता तेव्हा त्याच्यासोबत ही महिला होती जिची ओळख अजून समोर आली नाही. ही महिलाही या षडयंत्राचा भाग असू शकते असा अंदाज NIA अधिकाऱ्यांना आहे. ही महिला राणासोबत भारतात त्याची पत्नी म्हणून एकत्र राहत होती असं तपासात समोर आले आहे. आरोपी तहव्वूर राणाला एनआयए कोर्टाने १८ दिवसांची कोठडी सुनावली आहे. राणाची सातत्याने चौकशी गरजेची आहे कारण या प्रकरणी खूप मोठं षडयंत्र समोर येण्याची शक्यता आहे. जे पुरावे मिळालेत त्यातून भारताच्या सीमेबाहेरपर्यंत हे षडयंत्र रचले गेले आहे. देशातील इतर शहरांनाही टार्गेट करण्याची योजना होती. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळे सत्य जाणून घेण्यासाठी राणाची चौकशी आवश्यक आहे असं अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदर सिंह यांनी म्हटलं.
दरम्यान, NIA राणाकडून अशा लोकांची माहिती गोळा करत आहे जे त्याच्या संपर्कात होते. भारतात मुंबईशिवाय इतर ठिकाणीही दहशतवादी हल्ल्याची योजना होती का हेदेखील शोधले जात आहे. एका रिपोर्टनुसार, राणा चौकशीत NIA ला सहकार्य करत नाही आणि उडवाउडवीची उत्तरे देत वेळ वाया घालवत असल्याचं सांगितले जात आहे. मला माहिती नाही, आठवत नाही अशी उत्तरे तहव्वूर राणाकडून अधिकाऱ्यांना दिली जात आहेत.