नवी दिल्ली : नवनियुक्त खासदारांना शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी लोकसभा सचिवालयाने सुमारे २६५ माजी खासदारांना नोटीस बजावत, १८ जूनपर्यंत निवासस्थान रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.लोकसभेचे महासचिव यांनी ही कारवाई सामान्य प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले आहे़ ५५ माजी मंत्र्यांनाही २६ जूनपर्यंत आपले बंगले सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १६ व्या लोकसभेत नवनियुक्त मंत्र्यांसह सुमारे ३२० नवे खासदार आहेत़ त्यांना राष्ट्रीय राजधानीत शासकीय निवासस्थान उपलब्ध करून द्यायचे आहे़केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, हे एक आव्हानात्मक काम आहे़ माजी खासदारांनी एकदा निवासस्थाने सोडल्यानंतर ती नव्या खासदारांसाठी तयार केली जातील़ त्याअनुषंगाने या निवासस्थानांची रंगरंगोटी, दुरुस्ती आदी कार्य केले जाईल़नवे खासदार तूर्तास अस्थायीरूपाने राहात आहेत़ दिल्लीतील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विश्रामगृहांच्या २०० पेक्षा अधिक खोल्या तसेच भारतीय पर्यटन विकास महामंडळाच्या १५० पेक्षा अधिक कक्ष त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
२६५ माजी खासदारांना शासकीय निवासस्थाने सोडण्याचे आदेश
By admin | Published: June 09, 2014 4:31 AM