ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पूरग्रस्त तामिळनाडूतील स्थिती अतिशय गंभीर बनली असून राज्यात आत्तापर्यंत २६९ बळी गेले आहेत, अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली. नियम १९३ अतंर्गत देशातील विविध पूरग्रस्त भागांसदर्भात झालेल्या चर्चेवर ते उत्तर देत होते. केंद्र सरकार तामिळनाडूतील स्थितीवर संपूर्ण लक्ष ठेवून असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही पूराची हवाई पाहणी करण्यासाठी चेन्नईला रवाना झाल्याचे सिंह यांनी सांगितले.
संसदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले की ' १ ते २ डिसेंबर या २४ तासांच्या काळात राज्यात ३३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या १०० वर्षातील पावसाने गाठलेला हा उच्चांक आहे. तसेच हवामान विभागाने येत्या दोन ते दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात सर्वत्र पाणीच पाणी साचले असून तामिळनाडूची राजधानी तर अक्षरश: एक बेट बनले आहे. सतत पडणा-या पावसामुळे रेल्वे, रस्ते व हवाई वाहतुकीवर विपरित परिणाम झाला असून मदतकार्यातही अनेक अडचणी येत असल्याचे गृहमंत्र्यांनी नमूद केले.
दरम्यान एनडीआरएफची २८ पथके तामिळनाडू व पाँडेचेरीत तैनात करण्यात आली असून लष्कराची अनेक पथकेही पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच दिल्लीहून चार तर हैदराबादहून लष्कराची अतिरिक्त दोन पथके पाठवण्यात येत असून नौदलाच्या १२ नौका व २५५ जवान बचावकार्यात गुंतल्याचे सांगत सरकारच्या मदतकार्याची माहिती सादर केली. तसेच राज्यातील मदत व पुनर्वसनासाठी ९४० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.