काठमांडू/जळगाव : अयाेध्येला रामकथा आटाेपल्यानंतर नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बस मुसळधार पावसामुळे दुथडी भरुन वाहत असलेल्या नेपाळमधील मर्त्स्यांगडी नदीमध्ये सकाळी ११ वाजता काेसळली. या अपघातात २७ भाविकांचा मृत्यू झाला. तर १६ जण जखमी झाले आहेत. ते जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हाेते. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
वरणगाव (भुसावळ) परिसरातील ४१ भाविक १० दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी गेले हाेते. महाराष्ट्रातून नेपाळमध्ये दाखल झालेल्या १०४ भाविकांमध्ये त्यांचा समावेश हाेता. काठमांडूला बसने (यूपी५३-एफटी७६२३) जात होते. चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटले आणि बस तब्बल १५० फुट खाेल दरीत काेसळली. त्या बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ जण उपचारादरम्यान दगावले. बसमध्ये चालक व क्लिनरसह ४३ जण होते.
पंतप्रधान माेदी यांनी व्यक्त केले दु:खनेपाळमधील अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शाेक व्यक्त केला. अपघातात भाविकांच्या मृत्यूमुळे दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना, अशा शब्दांत माेदी यांनी भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे पथक पाठवले : मुख्यमंत्रीनेपाळ दुर्घटनेत जळगावचे काही नागरिक मृत्युमुखी पडले. त्यांना योग्य ती मदत राज्य शासनाच्यावतीने पोहोचविली जाईल. त्यांच्या मदतीसाठी आमदार व अधिकाऱ्यांना नेपाळ येथे पाठविले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
१६ मृतांची ओळख पटलीजळगावमधील २७ मृतांपैकी १६ जणांची ओळख पटली आहे. रामजीत ऊर्फ मुन्ना, सरला राणे (वय ४२), भारती जावळे (६२), तुळशीराम तावडे (६२), सरला तावडे (६२), संदीप सरोदे (४५), पल्लवी सरोदे (४३), अनुप सरोदे (२२), गणेश भारंबे (४०), नीलिमा धांडे (५७), पंकज भंगाळे (४५), परी भारंबे (८), अनिता पाटील, विजया जावळे (५०), रोहिणी जावळे (५१), प्रकाश कोळी यांचा समावेश आहे.
बेळी (ता. जळगाव) येथील कुंडलेश्वर संस्थानच्या वतीने अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे रामकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कथेसाठी जळगाव आणि तसेच इतर ठिकाणांहून जवळपास १५०० भाविक अयोध्येला गेले होते. सप्ताहाची सांगता झाल्यानंतर वरणगाव, पिंपळगाव, गोळेगाव, तळवेल, आचेगाव आणि भुसावळ येथील काही भाविक नेपाळकडे देवदर्शनासाठी दोन बसमधून रवाना झाले. त्यापैकी एक बस दरीत कोसळली.
मुख्य सचिवांना आदेश : फडणवीसनेपाळ येथील दुर्घटनेत जळगावच्या नागरिकांचा समावेश आहे. तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून नागरिकांच्या मदतीसाठी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. नेपाळच्या अधिकाऱ्यांशी समन्वय केला असून सगळी मदत देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. यू.पी. सरकारच्या माध्यमातून मृतदेह आणले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मदतकार्यात अडथळे : गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांचा प्रवाह आणखी वेगवान झाला असून बचावकार्य जिकिरीचे झाले आहे.
दूतावासाशी संपर्क : ही घटना कळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्रीय दूतावासाशी संपर्क केला. तसेच, नेपाळच्या सीमेवरील उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.