अमृतसर : पाकिस्तानातून अटारी-वाघा सीमेच्या मार्गाने भारतात आणलेला ५३२ किलो हेरॉइनचा साठा कस्टम अधिकाऱ्यांनी शनिवारी जप्त केला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत २,७०० कोटी आहे. पाकिस्तानातून तस्करी केलेला अमली पदार्थांचा इतका मोठा साठा कस्टमच्या आजवरच्या इतिहासात याआधी कधीही जप्त केला नव्हता.काश्मीरच्या हंडवारा येथे राहणारा तारिक अन्वर हा याचा सूत्रधार असून त्याला अटक केली आहे. त्याच्या अमृतसरमधील साथीदारालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याशिवाय ५२ किलो नार्कोटिक्सही हस्तगत करण्यात आले. पाकमधून आलेल्या मालवाहू ट्रकमध्ये हे अमली पदार्थ दडविले होते.कस्टम आयुक्त दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले, या तस्करीमध्ये आंतरराष्ट्रीय टोळी गुंतलेली आहे. पाकिस्तानातून सैंधव (काळे मीठ) घेऊन आलेला एक ट्रक भारतीय हद्दीत येताच शनिवारी दुपारी अडीच वाजता त्याची तपासणी करण्यात आली.
पाकिस्तानातून तस्करी केलेले २७०० कोटींचे हेरॉइन जप्त, कस्टमच्या इतिहासातील मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 4:18 AM