Corruption: २८ बँक खात्यात पैसाच पैसा, कॉलगर्ल्सपासून गर्लफ्रेंडपर्यंतचे शौक, सरकारी अधिकाऱ्याचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 08:12 PM2023-03-23T20:12:35+5:302023-03-23T20:13:25+5:30
Corruption: जिल्हाधिकारी कार्यालयातील एका करोडपती अधिकाऱ्याच्या लॉकरमधून पैसे आणि मालमत्ता समोर येत आहे. आतापर्यंत त्याच्या २८ बँक खात्यांची माहिती समोर आली आहे.
इंदूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयातील एका करोडपती अधिकाऱ्याच्या लॉकरमधून पैसे आणि मालमत्ता समोर येत आहे. आतापर्यंत त्याच्या २८ बँक खात्यांची माहिती समोर आली आहे. तो सरकारी पैसा त्याच्या पत्नीच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करत होतात तसेच दोन नंबरची कमाई मौजमजेवर उडवत होता. त्याने अनेक गर्लफ्रेंड्सशी संबंध ठेवले होते. त्यांच्यावर तो सरकारी पैशांची उधळपट्टी करत होता.
हल्लीच इंदूर कलेक्ट्रेट कार्यालयामध्ये असलेला सरकारी अधिकारी मिलाप चौहान याच्यावर घोटाळ्याचा आरोप लागला होता. प्राथमिक तपासात त्याने केलेला घोटाळा हा एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचा असल्याचे समोर आले होते. कलेक्टरांनी त्याला निलंबित करून तपासासाठी एडीएम राजेश राठोड याच्या नेतृत्वाखाली टीम स्थापन केली होती. त्यामध्ये या सरकारी अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचा उलगडा झाला. तसेच त्याने ५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम हडप केल्याचे समोर आले. हा पैसा त्याने २८ बँक खात्यांमध्ये वळवला होता. त्यातील अनेकजण त्याचे नातेवाईक होते. दरम्यान, घोटाळ्याचा हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मिलाप चौहान हा अधिकारी केवळ १२वी पास आहे. त्याने सरकारी लेखापरीक्षकांच्या दुर्लक्षाचा पुरेपूर फायदा उचलला. त्याने वेगवेगळ्या २८ खात्यांमध्ये ५ कोटींहून अधिक रक्कम वळवल्याचेही समोर आले. दरम्यान, चौकशीमध्ये त्याने या पैशांमधून केलेल्या उधळपट्टीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. त्याने दिलेली माहिती ऐकून तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. अनौपचारिक चर्चेदरम्यान, त्याने अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याने अनेकदा विमान प्रवास केला आहे. या कमाईतील बरीचशी रक्कम त्याने कॉलगर्ल्स आणि गर्लफ्रेंड्सवरही खर्च केली. तसेच नातेवाईक आणि परिचितांच्या नावावर जमिनीचे सौदेही केले.
एवढा घोटाळा समोर आल्यानंतरही अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच पोलिसांनीही कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. आता ही रक्कम या अधिकाऱ्याकडून कशी वसूल केली जाईल याबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे.