नोएडा – उत्तर प्रदेशातील नोएडा येथे २८ वर्षीय महिला डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डेंग्युमुळे मृत्यू झाल्याचं सरकारनेही पुष्टी केली आहे. काही दिवसांपूर्वी सेक्टर १२२ मध्ये राहणारी २८ वर्षीय होमियोपॅथी डॉक्टर अक्षिता सिंह हिला प्रचंड ताप आला होता. त्यानंतर कुटुंबाने तिला २ सप्टेंबरला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डेंग्यूची शंका असल्याने तिची तपासणी केली. रिपोर्टनंतर अक्षिताला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
या महिला डॉक्टरवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर ३ सप्टेंबरला उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. गौतमबुद्ध नगरचे सीएमओ म्हणाले की, अक्षिताला नातेवाईकांनी २ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर उपचारावेळी ३ तारखेला तिचे निधन झाले. मृत्यूच्या कारणांमध्ये डेंग्यू आणि मल्टी ऑर्गन फेलियर सांगण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे ४०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. सध्या १५० सक्रीय रुग्ण आहेत.
डेंग्यूपासून बचावासाठी परिसर स्वच्छ ठेवणे आणि मच्छरांची पैदास होऊ न देण्याचं आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छता विभागाने आतापर्यंत १०० हून अधिक ठिकाणी निष्काळजीपणा केलेल्या लोकांना नोटीस पाठवली आहे. डेंग्यूच्या अळ्या आढळणाऱ्या विविध संस्थांवर ३५ हजाराहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. नोएडातील सर्वाधिक डेंग्यू रुग्ण ग्रेटर नोएडाच्या हाईराइज हाऊसिंग सोसायटीत आढळले आहे. ग्रेटर नोएडा येथील ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रकोप पाहायला मिळत आहे.
हाऊसिंग सोसायटीतील स्विमिंग पूलची सफाई न झाल्याने आणि सोसायटीत सुरु असलेल्या बांधकामामुळे मलब्यात पाणी साचल्याने मच्छरांची पैदास झाली. त्यामुळे याठिकाणी डेंग्यू अधिक फोफावला. सोसायटीच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यातही डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. सध्या प्राधिकरणासोबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोसायटीवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यास सुरूवात केली आहे.